Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं…आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी वेळ देण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी 2.30 वाजता सुनावणी निश्चित केली आहे. या सुनावणीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले असून, ठाकरे आणि शिंदे गटासाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी वेळ देण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी 2.30 वाजता सुनावणी निश्चित केली आहे. या सुनावणीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले असून, ठाकरे आणि शिंदे गटासाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या न्यायालयीन घडामोडींविषयी माहिती देताना मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काल आम्ही दिवसभर सर्वोच्च न्यायालयात बसून होतो. मुख्य न्यायाधीशांसमोर आमचे हसरे चेहरे दाखवत बसलो होतो. ते आम्हाला पाहत होते, आम्ही त्यांना पाहत होतो. नजरेची टक्कर होत होती, पण न्याय काही मिळत नव्हता.”
राऊत यांनी पुढे सांगितले की, “आमच्या खटल्याचा क्रमांक 36 होता. 35वा खटला सुरू होणार इतक्यात न्यायालयाचे कामकाज संपले आणि कोर्ट उठले. त्यामुळे आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आता आमच्या ताटात बुंदी कधी पडते, याची आम्ही वाट पाहत आहोत,” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि असीम सरोदे हे बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आजही युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली असून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी 2.30 वाजता सुनावणीसाठी वेळ निश्चित केला आहे.
आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद न्यायालय ऐकणार असून, शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या वादातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
