Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ…

| Updated on: Jul 04, 2026 | 4:48 PM

राज्यात राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाशी स्वतःचा सहभाग असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यात राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाशी स्वतःचा सहभाग असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. “शिलापूजनाच्या काळात आम्ही गावोगावी शिला घेऊन फिरलो. त्या वेळी आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या. आम्ही स्कूटरवरून गावागावांत जाऊन जनजागृती केली. कारसेवेतही सहभागी झालो आणि बाबरी मशीद पाडली जात असतानाच्या घटनांचाही मी साक्षीदार आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक आठवणही सांगितली. “माझ्या लग्नाच्या स्वागत समारंभातही माझ्या पाठीमागे ‘राम मंदिर यही बनाएंगे’ असा संकल्प दर्शवणारा संदेश होता. राम मंदिराशी माझी भावनिक बांधिलकी आजही कायम आहे,” असे ते म्हणाले.

राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “जर दानपेटीत चोरी झाली असेल तर देव त्याला योग्य ती शिक्षा देईलच. मात्र सरकार म्हणून दोषींवर कठोर कारवाई करणे ही आमची जबाबदारी आहे.” या प्रकरणात कायद्यापुढे कोणालाही सूट मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेचाही उल्लेख करत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, राम मंदिरात चोरी करणारा कोणताही व्यक्ती असो, त्याला सोडले जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातील चौकशी आणि पुढील कारवाईकडे देशभरातील रामभक्त आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 04, 2026 4:48 PM
Follow Us