Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणापासून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएमधील सहभागापर्यंत विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी आणि शाह यांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांना आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडण्याची संधी मिळत असते. मात्र, यावेळी आपल्याला तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेचा उपयोग करून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील प्रश्नांवर केंद्राकडून काही न्याय मिळतो का, या उद्देशाने आपण जवळपास १० केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना तटकरे यांनी ही भेट सदिच्छा आणि मार्गदर्शनाच्या स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली असून, या भेटीत कोणत्याही प्रकारची वेगळी राजकीय चर्चा नव्हती, असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट सदिच्छा भेट असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, कोकणातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि या मार्गावरील टोलनाक्यांचा प्रश्नही तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात कोकणवासीयांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच रस्त्यावरील टोलनाक्यांबाबत चर्चा करण्यासाठी गडकरी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सुनील तटकरे यांच्या मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीला महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच, या भेटी केवळ सदिच्छा, मार्गदर्शन आणि राज्यातील विविध प्रश्न केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी झाल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या जवळिकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.