Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती केली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवरील विश्वास वाढत जावो अशी प्रार्थना केली.
पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीटद्वारे तसेच थेट संपर्क साधून पुण्याचं पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या, “मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याची नागरिक म्हणून आणि एक महिला म्हणून हात जोडून विनंती करते की, आपण पुण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी. पुण्याला न शोभणारं, न झेपणारं जे काही चाललेलं आहे, ते थांबवण्यासाठी आपणच पालकत्व घ्यावं.”
दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या मागणीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, “मी सुप्रियाताईंना धन्यवाद देतो. असाच विश्वास वृद्धिंगत होवो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या विश्वासाला जे वाटतं, पुण्यात पालकत्व घ्यावं, त्या पालकत्वाच्या भूमिकेतून देवेंद्रजी पुण्याचे संरक्षण करतील यावर मला पूर्ण विश्वास आहे.” सुप्रिया सुळेंच्या या मागणीमुळे आणि दरेकर यांच्या प्रत्युत्तरामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
