ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या नगराध्यक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंत यांनी पारकर ओपनिंग बॅट्समन म्हणून बोलल्याचे सांगत अर्थ समजून घ्यावा असे सूचक विधान केले आहे. तर पारकर यांनी कणकवलीच्या विकासासाठी सर्वांशी भेटत असल्याचे म्हटले आहे.
ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक नगराध्यक्षांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत पारकर यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, “संदेश पारकर शिवसेनेच्या (शिंदे गट) बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केले. त्यातूनच अर्थ समजून घ्यावा.” तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही, असेही सामंत यांनी नमूद करत आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
दुसरीकडे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या उपस्थितीचे स्पष्टीकरण दिले आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी आपण सर्व नेत्यांना भेटत असतो, असे पारकर यांनी सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराचा विकास साधणे ही आपली भूमिका आहे. त्यामुळे विकास निधीसाठी आणि कामांसाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारकर यांच्या या भूमिकेने त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
