विनोद तावडेंचा नियतीनेच 'विनोद' केला, अशोक चव्हाणांचे चिमटे

अशोक चव्हाण लोकसभेला तोंडावर आपटले आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला होता. पण चव्हाणांना सल्ला देणाऱ्या विनोद तावडे यांनाच भाजपने उमेदवारी दिली नाही. यावरुन चव्हाणांनी विनोद तावडे यांना टोमणा मारला.

विनोद तावडेंचा नियतीनेच 'विनोद' केला, अशोक चव्हाणांचे चिमटे

नांदेड : भाजपने तिकीट कापलेल्या विनोद तावडे यांच्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. विनोद तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला. आता त्यांनी लवकर काँग्रेसमध्ये यावं, मी तिकीट देतो, असा खोचक सल्लाही अशोक चव्हाण (Ashok Chavan taunts Vinod Tawde) यांनी दिला.

तिकीट कापलं जाण्याच्या काही दिवस आधी विनोद तावडे नांदेडला आले होते. अशोक चव्हाण लोकसभेला तोंडावर आपटले आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला होता. पण चव्हाणांना सल्ला देणाऱ्या विनोद तावडे यांनाच भाजपने उमेदवारी दिली नाही. यावरुन चव्हाणांनी विनोद तावडे यांना टोमणा मारला.

‘विनोद तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला. विनोद तावडे यांनी काँग्रेसमध्ये यावं, आपण त्यांना उमेदवारी देऊ, असं अशोक चव्हाण (Ashok Chavan taunts Vinod Tawde) म्हणाले. नांदेड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.

तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. निवडणुकीच्या काळात कोण चूक कोण बरोबर याचा विचार करण्याची ही वेळ नाही, असं विनोद तावडे म्हणाले होते.  भाजपने विनोद तावडे यांच्या ऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे. निवडणूक झाल्यानंतर मी अमित शाह, संघटक मंत्र्यांशी चर्चा करेन, असंही तावडे म्हणाले होते.

अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये अर्जमाघारीचा विक्रम

एका दिवसात तब्बल 84 अर्ज मागे घेण्याचा विक्रम नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात नोदवला गेला. अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. आता भोकरमध्ये केवळ सात उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यातील सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या भोकरमध्ये उरले फक्त सात जण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण सध्या भोकरमध्येच अडकून आहेत. भाजपने त्यांना श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या रुपाने तगडं आव्हान दिलं आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या अगोदर 2004 ला याच भोकरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीनिवास देशमुख गोरठेकर विजयी झाले. मात्र 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित बनला.

2014 मध्ये अशोक चव्हाण लोकसभेवर निवडून गेले, तर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण भोकरमधून विधानसभेवर निवडून आल्या. पण यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही लढाई सोपी राहिलेली नाही. 2019 मध्ये लोकसभेला अशोक चव्हाण यांना पराभूत केलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं पाठबळ गोरठेकरांसोबत आहे.

गोरठेकर हे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी आतापासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या मतदारसंघात अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याची खात्री गोरठेकर देतात. गोरठेकर यांच्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून अगदी सूक्ष्म पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *