मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि उपमुख्यमंत्रिपदी कोण? दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठरली

उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि उपमुख्यमंत्रिपदी कोण? दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठरली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि उपमुख्यमंत्रिपदावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित आणि पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली (Cabinet Expansion Date Fixed) आहे.

सुरुवातीला 23-24 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. मात्र सरकारकडून अद्याप राज्यपालांची वेळच घेण्यात आलेली नाही. शिवाय 25 आणि 26 तारखेला अमावस्या आणि चंद्रग्रहणाच्या फेऱ्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमी मानली जाते. त्यामुळे शुक्रवार 27 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरला विस्ताराचा मुहूर्त निघण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपदं द्यायची यावरुन खल सुरु आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते मंत्रिपदाबाबत चर्चेसाठी दिल्ली दरबारी गेले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील यंग ब्रिगेडही सरसावली आहे. काँग्रेसची यादी दोन चव्हाणांच्या मंत्रिपदाच्या आग्रहामुळे रखडली होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते.

काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्वाची खाती आहेत. त्यापैकी बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं देण्यात आलं. त्यामुळे दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हायकमांडकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसची यादीही दिल्लीत फायनल झाल्याचं कळतंय. त्यामुळे मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.

मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमकी किती मंत्रिपदं, याचा फॉर्म्युला अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने सांगितलेला नाही. मात्र खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 आणि काँग्रेसकडे 12 खाती आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त (Cabinet Expansion Date Fixed) कधी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम

राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती –  अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा

काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण

संबंधित बातम्या   

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, ‘ही’ सात नावं चर्चेत

ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे तगडी खाती, एकट्या एकनाथ शिंदेंकडे 10 मंत्रालये 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI