एक जोडीदार संसदेत, एक विधीमंडळात

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन जोड्या अशा आहेत, ज्यांच्यापैकी एक जोडीदार संसदेत, तर दुसरा विधीमंडळाची पायरी चढत आहे.

एक जोडीदार संसदेत, एक विधीमंडळात

मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यासारखी दिग्गज घराण्यांची पुढची पिढी विधीमंडळाची पायरी चढणार आहे. त्यामुळे एकाच घरात अनेक आमदार-खासदारांच्या जोड्या (Couples in Loksabha Vidhansabha) असतील. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन जोड्या अशा आहेत, ज्यांच्यापैकी एक जोडीदार लोकसभा निवडणुकीत खासदारपदी निवडून आल्यामुळे संसदेत पोहचला आहे, तर दुसरा जोडीदार विधानसभा जिंकत विधीमंडळाची पायरी चढत आहे.

धानोरकर दाम्पत्य आणि राणा दाम्पत्य या त्या वैशिष्ट्यपूर्ण जोड्या आहेत. या दोन्ही जोड्या विदर्भातील आहेत. एक जोडी आहे अमरावतीची, तर दुसरी चंद्रपूरची.

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली. 15 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले.

खरं तर नवनीत कौर मे महिन्यात निवडून आल्या, तेव्हाच ही खासदार-आमदाराची जोडी तयार झाली होती. आता पुढील पाच वर्षांसाठी यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं. नवनीर कौर अमरावती मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत मोदी सरकारकडे आवाज उठवतील, तर विधीमंडळात रवी राणा हे बडनेराचे प्रश्न मांडतील.

खासदार-आमदाराची दुसरी जोडी (Couples in Loksabha Vidhansabha) म्हणजे बाळू धानोरकर आणि प्रतिभा धानोरकर. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकून बाळू धानोरकर काँग्रेसच्या गोटात सामील झाले. चंद्रपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडूनही आले. महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला, ते म्हणजे धानोरकर. ‘आयाराम’ नेत्याला मतदारांनी स्वीकारलं होतं.

विधानसभेला बाळू धानोरकरांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने तिकीट दिलं. चंद्रपुरातील वरोरा मतदारसंघातून त्या रिंगणात उतरल्या होत्या. ही जागा 2014 मध्ये बाळू धानोरकर यांनीच जिंकली होती, मात्र पक्षांतर करताना त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ती रिक्त होती. धानोरकरांनी ही जागा आपल्या कुटुंबात राखली आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी शिवसेना उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला. दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने त्या निवडून आल्या आहेत.

अशोक चव्हाण-अमिता चव्हाण यांची जोडीही काही महिन्यांपूर्वी (2014 ते 2019) या गटात मोडत होती. कारण त्यावेळी अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते, तर अमिता चव्हाण भोकरमधून आमदार. परंतु लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अशोक चव्हाण पराभूत झाले. यंदा अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघातून ते विधानसभेला निवडून आले आहेत. परंतु अमिता चव्हाण यंदा विधीमंडळात नसतील.

एकाच घरातील खासदार-आमदार

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार बंधू अजित पवार तसेच भाचा रोहित पवार
(खासदारकीला उभे दुसरे भाचे पार्थ पवार पराभूत)

खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार पुत्र संतोष दानवे
(आमदारकीला उभे जावई हर्षवर्धन जाधव पराभूत)

खासदार हीना गावित आणि आमदार वडील विजयकुमार गावित

खासदार प्रितम मुंडे आणि खासदार आत्तेबहीण पूनम महाजन
(आमदारकीला उभी सख्खी बहीण पंकजा मुंडे पराभूत)

एकाच घरात अनेक आमदार

धीरज देशमुख – अमित देशमुख (सख्खे भाऊ)

सासरे शिवाजी कर्डिले पराभूत, जावई संग्राम जगताप विजयी

सुशिलकुमार शिंदे खासदारकीला पराभूत, कन्या प्रणिती शिंदे आमदारकीला विजयी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI