आमची युती ओवेसींसोबत, एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही

एमआयएमने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीतून (VBA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आघाडीबाबत आशादायी असल्याचे दिसत आहेत.

आमची युती ओवेसींसोबत, एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही

नागपूर: एमआयएमने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीतून (VBA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आघाडीबाबत आशादायी असल्याचे दिसत आहेत. आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी झाली नसून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्याशी झाल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. यातून त्यांनी महाराष्ट्र एमआयएमच्या नेत्यांच्या मताला किंमत देत नसल्याचेच अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी झालेली नाही. आमची युती एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडं आली आणि ते आता ओवेसींकडे निरोप घेऊन गेले आहेत. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे.

‘सरकारची अवस्था दारुड्याप्रमाणे झाल्यानेच गडकिल्ले विकायला काढले’

प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) गडकिल्ले धोरणावरही (New Fort Policy) टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. त्यांची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता गडकिल्ले विकायला काढले आहेत.

दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी युती तोडण्याचा निर्णय ओवेसी यांच्या सुचनेप्रमाणेच घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “आम्हाला खूपच कमी जागा दिल्या जात होत्या. आम्ही बराच काळ वाट पाहिली. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही. त्यामुळे अखेर आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”

‘ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका, मान्य करायची तर करा, नाही तर नाही’

इम्तियाज जलील म्हणाले, “असदुद्दीन ओवेसी यांना युतीबाबत मेल करण्यात आला होता. तो मेल मिळाल्यानंतर त्यांनी युतीबाबत काय भूमिका घ्याची याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही तातडीने प्रसिद्धीपत्रक काढून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कुणाला मान्य करायची असेल तर करावी नसेल करायची तर करू नये.”

‘मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार’

मी पक्षाचा लहान कार्यकर्ता असलो, तरी मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर मी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता किती जागा लढवायच्या, पुन्हा आघाडी करायची की नाही करायची? याचा अंतिम निर्णय ओवेसीच घेतील, असंही जलील यांनी नमूद केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *