भाजपने तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढा, 85 वर्षीय सुधाकरपंतांसाठी कार्यकर्ते आग्रही

सुधाकरपंत परिचारक यांनी दहा वर्षांपूर्वीच विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून सुधाकरपंतांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.

भाजपने तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढा, 85 वर्षीय सुधाकरपंतांसाठी कार्यकर्ते आग्रही

पंढरपूर : विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (Sudhakarpant Paricharak for Pandharpur) यांना भाजपने पंढरपुरातून विधानसभा निवडणुकांची उमेदवारी द्यावी, अशी मागणी परिचारक गटाने केली आहे. विशेष म्हणजे वयाच्या 85 व्या वर्षी सुधाकरपंतांनीही कार्यकर्त्यांच्या मागणीला सकारात्मक संकेत दिल्याची माहिती आहे.

परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मागणीने जोर (Sudhakarpant Paricharak for Pandharpur) धरला होता. परिचारक गटाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुधाकरपंतांना भाजपच्या तिकीटावर उमेदवारी देण्याची विनंती करणार आहे. भाजपने जर उमेदवारी नाकारली तर सुधाकरपंत परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.

सुधाकरपंत परिचारक यांनी दहा वर्षांपूर्वीच विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून सुधाकरपंतांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. तरीही पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहील, असं ते म्हणाले.

सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. दहा वर्ष सुधाकरपंत राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेतला आहे.

2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले.

भाजपमध्ये शेवटची मेगाभरती, भारत भालकेंच्या प्रवेशाची शक्यता

काँग्रेसचे भारत भालके हे पंढरपुरातून विद्यमान आमदार आहेत. भालके भाजपच्या वाटेवर असताना सुधाकरपंतांनीही शड्डू ठोकला आहे. भालकेंना भाजपने उमेदवारी दिली, तर सुधाकरपंत अपक्ष निवडणूक लढवून मोठं आवाहन उभं करु शकतात. त्यामुळे भालकेंच्या वाटेत अडचणी उभ्या राहण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत 21 सप्टेंबरपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *