निलंग्यात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अन् दहाव्या दिवशीही होणार दहाव्याचा विधी 

| Updated on: Nov 18, 2021 | 6:49 PM

ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीकडून कृषीपंपाचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर पैसे भरा, तरच ट्रान्सफार्मर मिळेल अशा शेतकरी विरोधी फतवाच काढण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोध म्हणून भाजपच्यावतीने निलंगा येथील शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली

निलंग्यात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अन् दहाव्या दिवशीही होणार दहाव्याचा विधी 
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती
Follow us on

लातूर : ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरण कंपनीकडून कृषीपंपाचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर पैसे भरा, तरच ट्रान्सफार्मर मिळेल अशा शेतकरी विरोधी फतवाच काढण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोध म्हणून भाजपच्यावतीने निलंगा येथील शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली तर निर्णय मागे न घेतल्यास दहाव्या दिवशी दहावाही घातला जाणार असल्याचा इशारा आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिला आहे.

सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. पण याकरिता सुरळीच विजपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारने थकीत कृषीपंपाची विजतोडणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा निषेध निलंगा येथे करण्यात आला आहे. या प्रतिकात्मक तिरडीला आ. निलंगेकर व भाजप जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी खांदा दिला होता. अंत्ययात्रेसमोर गाडग्याचे शिकाळे धरून एक शेतकरी शोकाकूल अवस्थेत चालत होता.

सरकारचा निर्णय म्हणजे दुष्काळात तेरावा

यंदा पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा त्याचबरोबर ऊसाचे क्षेत्रही वाढत आहे. या सर्व पिकांसाठी पाणीपुरवठा गरजेचा असतनाच महावितरण कंपनीने कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. शिवाय पाणी असूनही त्याचा फायदा होणार नाही. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे निलंगा येथे भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

पोलीसांनी अडविला अंत्यविधी

निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रेकयात्रेला सुरवात झाली होती. तर तहसिल कार्यालय परिसरातच अंत्यविधी केला जाणार होता. शेतकरी तहसिल कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेताचे अंत्यविधी करण्यासाठी गेले. मात्र तेथे निलंगा येथील पोलिस अधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक प्रेत व तिरडी ताब्यात घेऊन अंत्यविधी करू दिला नाही. मात्र, हा अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास दहाव्या दिवशी दहावा हा घातला जाणार असल्याचा इशारा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

काय आहेत मागण्या ?

वीज विभागाने काढलेला काळा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, 3 एचपीसाठी 16 हजार रुपये आणि 5 एचपीसाठी 25 हजार रुपये ही वीज बिलाची सक्ती थांबवावी, शेतकऱ्यांची तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. यावेळी जिल्हाभरातून शेतकरी सहभागी झाले होते तर वेगवेगळ्या पध्दतीने सरकारच्या निर्णयाचा निषेध यावेळी शेतकऱ्यांनी केला. यावेळी आ. रमेश कराड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, प्रेरणा होनराव, नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मनोज काळे उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

तयारी आगामी खरीप हंगामाची, कसे केले जाते बीजोत्पादन?

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

ज्याच्यावर भिस्त ‘ते’ खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी