खरिपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

ढगाळ वातावरणाचा धोका (Kharif) खरीपातील तूर आणि कापसाला होत आहे. खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले होते तर आता उर्वरीत पिकांना या ढगाळ वातावरणाने निर्माण झालेल्या परस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. खरीपातील या दोन पिकांच्या उत्पादनाबद्दल शेतकरी आशादायी असतानाच अचानक वातावरणात बदल झालेला आहे.

खरिपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मराठवाड्यात (Marathwada)  ऐन दिवाळीत पावसाची शक्यता नर्माण झाली आहे. मात्र, त्यापूर्वी निर्माण झालेल्या (Danger to crops due to cloudy weather) ढगाळ वातावरणाचा धोका (Kharif) खरीपातील तूर आणि कापसाला होत आहे. खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले होते तर आता उर्वरीत पिकांना या ढगाळ वातावरणाने निर्माण झालेल्या परस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. खरीपातील या दोन पिकांच्या उत्पादनाबद्दल शेतकरी आशादायी असतानाच अचानक वातावरणात बदल झालेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केला असून या काळात पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात रब्बीच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला असला तरी खरीपातील तूर आणि कापूस ही पिके वावरातच आहेत. दोन दिवसांमध्ये पाऊस झाला तर त्याचा फायदा रब्बी पिकांसाठी होणार आहे. मात्र, जर ढगाळ वातावरण असेच कायम राहिले तर मात्र, कपाशीवर बोंडअळी आणि तूरीची शेंगगळतीचा धोका कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिलेला आहे.

तुरीवर आळीचा प्रादुर्भाव

मराठवाड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य वेळीच फवारणी केली तर या पिकाचे संरक्षण होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी कोरॅझिन, क्लोरोसाफर यासारख्या औषधांचे मिश्रण योग्य प्रमाणात पाणी घेऊन करावे व त्यानंतर फवारणी करण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे. कारण तुरीचे पिक अंतिम टप्प्यात आहे. अशातच अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला तर याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. शिवाय बुरशीचाही धोका या वातावरणामुळे झाला आहे त्यामुळे बुरशीनाशकाची फावारणी करणे गरजेचे झाले आहे.

कापसाला गुलाभी बोंडअळीचा धोका

खरीपातील कापसाला यंदा विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान या पिकातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. तर आता कापूस वेचणी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होणार आहे. शिवाय ‘बीटी’ ची फवारणी करुन पिकाचे या वातावरणापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.

रब्बीसाठी पोषक पाऊस

खरीपातील केवळ कापूस आणि तुर हीच पिके आता वावरात आहेत. शिवाय सोयाबीनच्या क्षेत्रावर रब्बीची पेरणी सुरु झाली आहे. मराठवाडा आणि पुणे विभागात सरासरीच्या 10 क्षेत्रावर पेरण्या ह्या झालेल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली आहेत त्यांच्यासाठी हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. कारण पेरणीसाठी आवश्यक असणारी ओल ही या पावसामुळे मिळणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तर रब्बीसाठी फायदेशीर मात्र, ढगाळ वातावरणाचा धोका हा राहणारच आहे.

संबंधित बातम्या :

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

कडधान्यसाठा मर्यादेची मुदत संपली आता काय? सराकरचा उद्देश साध्य झाला का?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI