पावसामुळे शेती कामाला अन् ऊसतोडणीलाही लागले ब्रेक, कोल्हापूरात दोन दिवस ऊसाचे गाळप बंद

कोकणमध्ये आंबा फळाला याचा फटका बसला आहे तर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या आहेत. असे असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात तर ऊसतोडणीलाही 'ब्रेक' लागले आहे. आतापर्यंत पिकांचे नुकसान होत होते पण आता ऊसतोडणीसारखी कामेही ठप्प झाली आहेत.

पावसामुळे शेती कामाला अन् ऊसतोडणीलाही लागले ब्रेक, कोल्हापूरात दोन दिवस ऊसाचे गाळप बंद
प्रातिनिधीक फोटो

कोल्हापूर : अवकाळी पावसाचा परिणाम सर्वच शेती घटकांशी झालेला आहे. कोकणमध्ये आंबा फळाला याचा फटका बसला आहे तर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या आहेत. असे असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात तर (Sugarcane harvesting) ऊसतोडणीलाही ‘ब्रेक’ लागले आहे. आतापर्यंत पिकांचे नुकसान होत होते पण आता ऊसतोडणीसारखी कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे अवकाळीचा परिणाम हा सर्वच बाबींवर झाला आहे. शिवाय होणारे नुकसान हे न भरुन निघणारे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसाचे गाळप होते मात्र, पावसामुळे ऊसतोडणी शक्य नाही शिवाय इतर शेतीकामेही ठप्प झाली आहेत.

ऊस कामगारांचे बेहाल

ऊस तोडणीच्या अनुशंगाने तात्पूरत्या खोपटाचा आधार घेऊन हे कामगार शेत शिवारात राहत असतात. पण गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे वास्तव्य करणे देखील कामगारांना शक्य होत नाही. खोपटामध्ये पाणी शिरले आहे तर ऊसाच्या सऱ्यांमध्येही पाणी साचले असल्याने तोडणी शक्य नाही. ऊसतोडणीला जाणारे मजूर आता राहण्याची व्यवस्था करण्यातच दंग आहेत.

ऊसाच्या सऱ्यांमध्ये साचले पाणी, शेतकऱ्यांचे हाल

अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उसाच्या शेतामधील सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने ऊस तोडणी खोळंबली आहे. अर्धवट तोडणी झालेला ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागतेय. जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या एका शेतकऱ्याला शेतात पाणी साचल्याने एक ट्रॉली ऊस बाहेर काढण्यासाठी चक्क पाच ट्रॅक्टर जोडावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसतोय शिवाय मोठा मनस्तापही सहन करावा लागतोय

ऊस कारखानेही पडले ओस

ऊसाचे सर्वात गाळप हे कोल्हापूर जिल्ह्यात होते. मात्र, यामध्येही अवकाळी पावसाने व्यत्यय आणलेला आहे. कारण बुधवारी ऊसाच्या सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने तोडणी अशक्य झाली आहे. गुरुवारी एकही वाहन ऊस घेऊन कारखान्याकडे मार्गस्थ झालेले नव्हते. शिवाय शुक्रवारी सकाळीही वातावरण हे ढगाळ असल्याने प्रत्यक्ष तोडणीला सुरवातही झालेली नव्हती. त्यामुळे अवकाळी आणि वातावरणातील बदलाचा परिणाम शेती संबंधीत असलेल्या अनेक घटकांवर झालेला आहे.

दोन दिवस गाळपच राहणार बंद

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी शंभर टक्के ऊसतोडणीची कामे ही थांबलेली होती. कोयता हा ऊसाला लावताच आलेला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस हे कारखाने बंदच राहणार आहेत. आगामी काळात जर पाऊस झाला नाही तरच दोन दिवसांनी ऊलतोडणी होऊ शकणार आहे. कारण ऊसतोडणी झाली तरी वाहनांद्वारे ऊस कारखान्यांकडे मार्गस्त करताना अनंत अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. त्यामुळे त्यामुळे दोन दिवस ऊसाचे गाळपच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीत तारले, पण अवकाळीने मारले, नांदेड जिल्ह्यातील केळी बागा भुईसपाट

पाऊस उघडीपनंतर ‘असे’ करा कांद्याचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

छोट्या गावांमध्ये मोठा व्यवसाय; शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राज्य सरकारची काय आहे योजना?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI