Rain Update: पेरणीची मिटली चिंता… मान्सून अजून सक्रिय होणार? बि-बियाण्यांची खरेदी करावी काय?
Monsoon Alert Farmer: जून महिन्याच्या सुरुवातीला चकवा देणारा पाऊस अखेरच्या टप्प्यात सक्रिय झाला. गेल्या दोन दिवसात पश्चिम वऱ्हाडासह राज्यातील विविध भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मशागतीच्या कामांना वेग आला. मान्सून अजून सक्रिय होणार? बि-बियाणे खरेदी करावे का?

Monsoon Alert Farmer: जून महिन्यात पावसाने जणू अधिक मास पाळला. अधिक मास संपताच राज्यात मान्सूनचा सांगावा गेल्या दोन दिवसात राज्यभर गेला. दोन दिवसात राज्यात दमदार पाऊस पडला. पश्चिम वऱ्हाडासह राज्याच्या विविध भागात पावसाची समाधानकारक नोंद झाली. 20 जून रोजी राज्यात एकूण पावसाचे प्रमाण 29.5 मिमी होते. तर अवघ्या 96 तासांत राज्यात सरासरी 13.4 मिमी पाऊस पडला. राज्याने हंगामातील 25.8 टक्के सरासरी गाठली आहे. अजून सहा दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. या पावसामुळे खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. पाऊस नसल्याने ढेकळं फुटत नव्हती. पण आता नांगरणीनंतरच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.
धूळ पेरण्या वाचल्या, शेतकऱ्यांचा खर्च वाचला
पावसाने डोळे वटारल्याने पिकं करपण्याची आणि उगवणीवर परिणामाची भीती निर्माण झाली होती. काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर तुषार, ठिबक सिंचनाच्या मदतीने पेरणी केली होती. पण दोन दिवसांच्या दमदार पावसाने ही भीती दूर झाली आहे. शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचला आहे. आभाळमाया असल्याने पीकं करपण्याची शक्यता नाही. तर दमदार पावसामुळे पिकं जोमानं वाढण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय असण्याची शक्यता लक्षात घेत शेतकरी आता कामाला लागला आहे.
खत, बियाणे खरेदीसाठी गर्दी
राज्यात सर्वदूर पावसाने तुफान बॅटिंग केली. खरिपाच्या पेरण्यावरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले. पावसामुळे शेतकरी आनंदून गेला आहे. त्याने लागलीच खत आणि बियाण्यांच्या दुकानेकडे धाव घेतली आहे. दुकाने विविध बियाण्यांनी भरून गेली आहे. गेल्या 15 दिवसांत या दुकानांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. तुरळक गर्दी होती. पण दोन दिवसांच्या दमदार पावसाने चित्र पालटले. शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी आवश्यक बि-बियाणे, खते आणि इतर साहित्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागात, तालुका, बाजार गावात दुकानांसमोर गर्दी उसळली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. शिवारातही मोठी लगबग सुरू आहे.
चार ते पाच दिवसात मुसळधार
मान्सून राज्यभर व्यापला आहे. कोकण किनारपट्टीवर ढगांची जमवाजमव सुरू झाली आहे. ढग दाटून आले आहेत. त्यामुळे राज्यात पावसाने चांगली सुरूवात केली आहे. पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांच्या मते, येत्या 4 ते 5 दिवसात राज्यभर दमदार पाऊस होईल. राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. जून महिन्यात जवळपास 72 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली होती. पण येत्या पाच दिवसात ही तूट भरून निघेल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.