कार कंपन्या लिजवर देत आहेत कार, काय आहेत याचे फायदे-तोटे?
ही कार कंपन्या भाडेतत्त्वावर (Car Lease in India) कार देत आहेत. भारतात हा ट्रेंड लोकांना आवडला आहे. कार कंपन्या ती मर्यादित कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देतात.

मुंबई : आपल्या पैकी बर्याच लोकांना कार खरेदी करायची आहे परंतु आर्थिक कारणांमुळे ते कार खरेदी करू शकत नाहीत. याशीवाय देखभालीसारख्या कारणांमुळे काही जण त्यातून माघार घेतात. हे पाहता काही कार कंपन्या भाडेतत्त्वावर (Car Lease in India) कार देत आहेत. भारतात हा ट्रेंड लोकांना आवडला आहे. कार कंपन्या ती मर्यादित कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देतात. यामध्ये कारची देखभाल आणि सर्व्हिसिंगची सुविधाही दिली जात आहे. कार भाडेतत्त्वावर देण्याबरोबरच कंपन्या काही अटी देखील जोडत आहेत ज्यांचे पालन ग्राहकांना करावे लागेल.
कार लिजिंग म्हणजे काय?
कार लिजिंग म्हणजे कार तुमच्याकडे राहील आणि त्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम द्यावी लागेल. कारचे मॉडेल, कालावधी इत्यादी लक्षात घेऊन ही किंमत ठरवली जाईल. यासाठी कोणतेही डाऊन पेमेंट द्यावे लागणार नसून सुरक्षा रक्कम द्यावी लागेल. सोबतच ते किती किलोमीटर चालवायचे हेही ठरवले जाणार आहे. निर्धारित किमीपेक्षा जास्त गाडी चालवल्यास जास्त रक्कम मोजावी लागेल. दर तीन महिन्यांनी किंवा सेवा पूर्ण झाल्यानंतर कंपनी तपासेल.
कार लिजवर घेणे आणि खरेदी करणे यात किती फरक आहे?
उदाहरणार्थ, जर तुम्ही Hyundai ची Grand i10 3 वर्षांसाठी लीजवर घेतली तर तुम्हाला दरमहा सुमारे 18 हजार रुपये द्यावे लागतील. यामध्ये देखभालीचाही समावेश आहे. या प्रकरणात, तुम्हाला सुमारे 6.66 लाख रुपये द्यावे लागतील.
तर, जर तुम्ही कार खरेदी केली आणि 1 लाखांचे डाउनपेमेंट केले आणि 4.75 लाखांचे कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा अंदाजे 15 हजार रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात, डाऊनपेमेंटसह सुमारे 5.47 लाख खर्च करावे लागतील. यामध्ये कारशी संबंधित इतर खर्चाचा समावेश असणार नाही. यामध्ये तीन वर्षांनंतरही कार तुमच्यासोबत असेल.
भाडेतत्त्वावर कार घेण्याचे फायदे आणि तोटे
देशात ह्युंदाई, महिंद्रा, होंडा यासारख्या कंपन्या भाडेतत्त्वावर कार देत आहेत. यासाठी केवायसी पूर्ण करावे लागेल. भाडेतत्त्वावर कार घेण्याचा फायदा म्हणजे त्यासाठी तुम्हाला डाउन पेमेंट करावे लागत नाही. तुम्हाला देखभाल व इतर खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे दरमहा रक्कम भरल्यानंतरही तुम्ही गाडीचे मालक होऊ शकत नाही. ठराविक वेळेनंतर कार कंपनीकडे परत करावी लागते.
