क्लीनरमुळे ट्रकचालकांना होणारा दंड रद्द, राज्य सरकारची अधिसूचना जारी
या निर्णयाची फाईल अनेकवर्षे खात्यातून फिरत होती. त्यामुळे हा निर्णय उशीरा लागला आहे. परिवहन क्षेत्राच्या एकजुटीच्या आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत अवजड मोटर व्हेईकल्स (HMVs) मधील क्लीनरच्या उपस्थितीमुळे लावला जाणारा दंड अखेर रद्द केला आहे. या संदर्भातील सरकारी अधिसूचना आता अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या परिवहन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील ट्रक चालक आणि व्यावसायिक वाहन चालक हे क्लीनरसोबत प्रवास करत असल्यामुळे त्यांना रोज ₹ १५००/- दंड आणि सतत चालान भरावे लागत होते. ही कारवाई अन्यायकारक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक होती, ज्यामुळे हजारो ट्रान्सपोर्टर्सना आर्थिक फटका बसत होता आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
हा मुद्दा सातत्यपूर्ण पाठपुरावा, बैठका आणि विविध विभागांशी समन्वय साधून सोडवण्यात आला आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्य मंत्री माधुरी मिसाळ,अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी,अपर मुख्य सचिव (गृह)इकबाल सिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सहभाग घेत ट्रक चालकांना दिलासा दिल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (AIMTC) चे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.
कायदेशीर प्रक्रियांमुळे ही फाईल कायदा आणि न्याय विभाग तसेच गृह विभागात विविध पातळ्यांवर फिरत होती, त्यामुळे अधिसूचनेस वेळ लागला. मात्र परिवहन क्षेत्राच्या एकजुटीच्या आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.
“हा केवळ प्रशासनिक निर्णय नाही, तर हा त्या प्रत्येक ट्रकचालक, ट्रान्सपोर्टर आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे, जे या लढ्यात आमच्यासोबत उभे राहिले. आमच्या एकत्रित प्रयत्नांनी आणि निर्धाराने हा न्याय मिळवण्यात यश आले. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे, तसेच चालकवर्गाला अनावश्यक त्रास आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळणार आहे असेही अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.हा निर्णय परिवहन क्षेत्रासाठी सकारात्मक बदल घडवणारा टप्पा ठरेल आणि संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून दीर्घकालीन प्रश्न सोडवता येतात, हे यामुळे सिद्ध झाले असल्याचे मलकीत सिंह यांनी म्हटले आहे.
