महिन्यातून किती वेळा कार धुवावी? ‘ही’ चूक केल्यास रंग होईल खराब
गाडी स्वच्छ ठेवण्यासाठी ती वेळोवेळी धुणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना माहित नसते की, गाडी महिन्यातून किती वेळा धुवावी? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुमच्यापैकी अनेकांकडे कार असेल. प्रत्येक कार मालकाला आपली गाडी चांगली आणि चमकदार दिसावी असं वाटतं. कार स्वच्छ आणि चमकदार असेल तर त्यातून प्रवास करण्याची मजा ही वेगळीच असते. गाडी स्वच्छ ठेवण्यासाठी ती वेळोवेळी धुणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना माहित नसते की, गाडी महिन्यातून किती वेळा धुवावी? जर तुम्ही गाडी जास्त वेळा धुतली तर रंग खराब होऊ शकतो आणि कमी वेळा धुतली तर कारवर घाण साचू शकते, ज्यामुळे तुमची गाडी खराब होऊ शकते. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गाडी जास्त किंवा खूप कमी धुण्याचे तोटे
तुम्ही गाडी कमी वेळा धुतली तर त्यावर धूळ साचत थर साचतो. यामुळे गाडीचा लूकच खराब होतो आणि रंगावरही परिणाम होतो. तसेच तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी साबण आणि शाम्पूने गाडी धुतली तर रंगाची चमक हळूहळू कमी होऊ शकते. यात काही रासायनिक घटक असतात, त्यामुळे गाडीच्या रंगावर परिणाम होतो. त्यामुळे कार वारंवार धुणे हे चांगले नाही.
कार किती वेळा धुवायची हे अनेक घटकांवर अवलंबून
कार किती वेळा धवायची हे अनेक घटकांवर अवलंबून असते. तुम्ही कुठे राहता? तुम्ही दररोज किती गाडी चालवता हवामान कसे आहे? या सर्व गोष्टी कार धुण्यावर परिणाम करतात. जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर तुम्ही महिन्यातून किमान 2 ते 4 वेळा कार धुवावी. कारण शहरात धुळीचे प्रमाण जास्त असते, ती साफ करण्यासाठी 8 ते 15 दिवसांच्या अंतराने कार धुणे गरजेचे आहे. जर कार वेळेवर स्वच्छ केली नाही तर ती पेंटवर कायमचे डाग सोडू शकते.
हवामान
पावसाळ्यात पावसामुळे आणि चिखलामुळे कार लवकर खराब होते. पावसामुळे मडगार्ड, व्हील आर्च आणि अंडरबॉडीमध्येही चिखल साचतो. हा चिखल लवकरात लवकर स्वच्छ केला नाही तर गंज येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत 5-6 वेळा कार घुण्याची गरज भासू शकते. तर हिवाळ्यात महिन्यातून 3-4 वेळा आणि उन्हाळ्यात दर 2 आठवड्यांनी एकदा कार धुणे आवश्यक आहे.
कार धुण्याची योग्य पद्धत
कार किती वेळा धुवायची यासह कार धुण्याची योग्य पद्धत माहित असणे गरजेचे आहे. नेहमी मऊ मायक्रोफायबर कापड, कार शॅम्पू आणि स्वच्छ पाणी वापरा. प्रेशर वॉशर वापरताना पाण्याचे स्पीड जास्त नसावा, प्रेशर जास्त असेल तर रंगाचे नुकसान होण्याची शक्यता असते.
