आता कारशीही AI करणार संवाद! Hyundai ची नवी सेडान आली भन्नाट अवतारात; हायब्रिड इंजिनसह फीचर्सचा धमाका
Hyundai 2027 Elantra Unveiled: ह्युंदाईची नवी सेडान तुम्हाला थक्क करून सोडणार आहे. यात एआय आणि हायब्रीड फीचर्स आहेत. हायब्रिड इंजिनपासून AI फीचर्सपर्यंत सगळंच खास आहे.

ह्युंदाई सध्या आपल्या नवीन वाहनांमुळे सतत चर्चेत आहे. कंपनीने आणखी एका कारचे अनावरण केले आहे. लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये कंपनीने आपल्या लोकप्रिय सेडान एलेंट्राच्या आठव्या वर्जनचे अनावरण केले. दक्षिण कोरियामध्ये ‘अवांटे’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नवीन सेडानमध्ये पूर्णपणे नवीन लूक, मोठा आकार, शक्तिशाली हायब्रीड इंजिन आणि प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे.
नवीन 2027 ह्युंदाई एलेंट्रा ही कंपनीच्या नवीन ‘आर्ट ऑफ स्टील’ डिझाइन लँग्वेजवर आधारित आहे. ज्यामुळे तिला अधिक आकर्षक आणि स्पोर्टी लूक मिळतो. तिच्या बाह्य रचनेत नवीन एच-एज लायटिंग, पुन्हा डिझाइन केलेली फ्रंट ग्रिल, फ्लश डोअर हँडल्स आणि सिग्नेचर ग्राफिन ग्रीन पर्ल रंगाचा पर्याय यांचा समावेश आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत ही कार 85 मिमी लांब आणि 30 मिमी रुंद आहे. तिचा व्हीलबेस देखील 30 मिमीने वाढून 2,750 मिमी झाला आहे.
तिच्या मोठ्या आकारामुळे मागील सीटवरील प्रवाशांना आता 993 मिमी लेगरूम आणि 958 मिमी हेडरूमचा पुरेपूर आनंद मिळतो. केबिनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे त्यातील तंत्रज्ञान. या कारमध्ये मोठी 12.9 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, जी अँड्रॉइड ऑटोमोटिव्ह ओएसवर आधारित ह्युंदाईच्या नवीन प्लीओस कनेक्ट प्लॅटफॉर्मवर चालते. जरी यात ओव्हर-द-एअर अपडेट्स आणि थर्ड-पार्टी ॲप्सना सपोर्ट असला तरी महत्त्वाच्या कार्यांसाठी भौतिक बटणे कायम ठेवण्यात आली आहेत.
या कारमध्ये ग्लिओ एआय व्हॉइस असिस्टंटची सुविधा देखील आहे. यात दोन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. हायब्रीड व्हेरिएंटमध्ये 1.6 लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर यांचा संयोग असून ते एकूण 155 बीएचपी शक्ती निर्माण करते आणि त्याला 6 स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन जोडलेले आहे. यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि एक खास ‘स्टे मोड’ देखील आहे, ज्यामुळे गाडी पार्क केलेली असतानाही इंजिन सुरू न करता केबिनमधील निवडक वैशिष्ट्ये सक्रिय करता येतात.
दुसरा पर्याय 2.0 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा आहे, जे 146 बीएचपी शक्ती निर्माण करते आणि ते आयव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. सुरक्षेच्या बाबतीत नवीन एलेंट्रामध्ये ह्युंदाई स्मार्टसेन्स एडीएएस तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, लेन-कीपिंग असिस्ट आणि ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग यांसारख्या प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
