कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन

कोरोना लसीकरणासाठी तरतूद हे सामान्यांना दिलासा देणारी आहे," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis Comment On Union Budget 2021) 

कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन

मुंबई : “आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले आहेत. तरीसुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करणार आहे. तसेच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा संकल्प आणखी दृढ करणारा आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadnavis Comment On Union Budget 2021)

“शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, मेट्रो इत्यादी पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योजक अशा सर्वच आघाड्यांवर विकासाला एक नवीन गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी कायद्यांवरून देशात आंदोलन सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितींच्या अधिकारांवर गदा येतील, अशी शंका सर्वत्र घेतली जात होती. पण, या अर्थसंकल्पातून बाजार समित्यांना भक्कम करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे बाजार समित्यांबाबत सरकारने एकप्रकारे आपले धोरण स्पष्ट केले आहे. सूक्ष्म सिंचनासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे,” असे फडणवीस म्हणाले.

“पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारमण यांचे आभार”

“धान्यखरेदीची आकडेवारी स्पष्ट करताना किमान आधारभूत किंमतीसाठी केंद्र सरकार कसे प्रतिबद्ध आहे, हेच दिसून येते. गहू, तांदूळ यांची गेल्या सरकारपेक्षा दुपटीहून अधिक, तर दाळीची 5 पटीहून अधिक खरेदी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रासाठीची तरतूद पाहिली तर 2013-14 च्या तुलनेत 5 पट अधिक तरतूद शेती क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 16 लाख कोटी रूपये इतके कर्ज शेतकर्‍यांना उभारता येणार आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

“महाराष्ट्रासाठी सर्वाधिक आनंदाची बातमी म्हणजे नागपूर मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 5976 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी नीओ मेट्रोचे एक नवीन प्रारूप आमच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते. नाशिक आणि नागपूरचा टप्पा-2 हे दोन्ही प्रस्ताव आमच्या सरकारच्या काळात पाठविण्यात आले होते. ते स्वीकारल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मन:पूर्वक आभार मानतो,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीकरणासाठी तरतूद ही सामान्यांना दिलासा देणारी 

“ग्रामीण पायाभूत सुविधा क्षेत्राला सुद्धा मोठी चालना या अर्थसंकल्पाने दिली आहे. कामगारांसाठी अनेक क्रांतिकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाचा काळ असल्याने आरोग्य क्षेत्रातील प्राथमिकता वाढल्या आहेत. या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता 131 टक्के खर्च वाढविण्यात आला आहे. 28 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक भक्कम करण्यात येणार आहे.  35 हजार कोटी रूपयांची कोरोना लसीकरणासाठी तरतूद हे सामान्यांना दिलासा देणारी आहे,” असेही ते म्हणाले.

“परवडणार्‍या घरांसाठी प्राप्तीकरात व्याजसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे परवडणार्‍या घरांना चालना मिळेल. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमांतून लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देत असतानाच आजच्या अर्थसंकल्पात आणखी 15,700 कोटी रूपयांची तरतूद एमएसएमईसाठी करण्यात आली आहे. एकूणच कोरोना संकटामुळे एक प्रकारची नकारात्मकता देशात असताना सुद्धा देशाला आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis Comment On Union Budget 2021)

संबंधित बातम्या : 

Budget 2021 : अर्थमंत्र्यांकडून ‘सरकारी सेल’ची घोषणा, वाचा काय काय विकणार सरकार?

Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?

Published On - 7:32 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI