EPFO सदस्यांना मिळणार चांगली बातमी, पेन्शन इतके वाढणार?
पेन्शन वाढवण्यासंदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. परंतु कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांकडून ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

EPS Pension Hike: ईपीएफओचे सदस्य असणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. ईपीएफओ सदस्याचे निवृत्त वेतन वाढणार आहे. संसदेच्या समितीने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पेन्शन एक हजारावरुन 7500 रुपये करण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2014 मध्ये ईपीएफओ सदस्यांना मिळणारे 250 रुपये पेन्शन वाढवून एक हजार रुपये केले होते.
दीर्घ काळापासून पेन्शनची रक्कम 7500 रुपये करण्याची मागणी ट्रेड युनियन आणि पेन्शन संघाकडून केली जात आहे. महागाई वाढल्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. मागील अकरा वर्षांत महागाईचा दर अनेक पटींना वाढला, परंतु निवृत्ती वेतन वाढले नाही, असा दावा करण्यात येत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कामगार मंत्रालयाच्या संसदीय समितीने केंद्र सरकारला ईपीएफओचे निवृत्ती वेतन वाढवण्याचा आग्रह केला आहे. सध्या हे निवृत्ती वेतन एक हजार रुपये आहे. 2014 मधील महागाईची तुलना 2025 सोबत केल्यावर निवृत्ती वेतनात वाढ करण्याची गरज स्पष्ट होईल. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने निवृत्तीवेतन धारक आणि त्यांच्या परिवाराकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
संसदीय समितीने म्हटले आहे की, कोणतीही योजना सुरू झाल्यानंतर 30 वर्षांनी, तिचे थर्ड पार्टी मूल्यांकन केले जाते. आता ही प्रक्रिया 2025 वर्ष संपण्यापूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण केली जावी. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी, ईपीएफ खात्यासाठी त्यांच्या मूळ पगारावर 12% रक्कम कपात केली जाते. तसेच कंपनीसुद्धा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 12% रक्कम जमा करते. कंपनीने जमा केलेल्या रक्कमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये वर्ग केली जाते.
पेन्शन वाढवण्यासंदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. परंतु कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांकडून ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
