Investment Schemes : डब्ब्यात कशाला लपवता? इथं गुंतवा आणि जोरदार कमाई करा, महिलांसाठी 5 जबरदस्त गुंतवणूक योजना
Best Investment Schemes : आजही महिला घरखर्चातून वाचलेला पैसा डब्ब्यात ठेवतात. अडचणीच्या वेळी हा पैसा बाहेर येतो. पण तोपर्यंत घरातील सदस्यांना त्याचा सुगावा लागत नाही. त्याऐवजी या चांगल्या गुंतवणूक योजनेत जर गुंतवणूक केली. तर फायदा होऊ शकतो.

Five Investment Schemes For Women : आज महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत. पण तरीही अनेक जणी त्यांची कमाई अथवा घरातील पैसा डब्ब्यातच लपवून ठेवतात. अडचणीच्या काळात हा पैसा बाहेर येतो. महिलांसाठी अनेक चांगल्या गुंतवणूक योजना आहेत. विविध सरकारी आणि गैर सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांचा पैसा वाढेल. त्यांना चांगला परतावा सुद्धा मिळेल. या योजनांवर महिलांना कर लाभ सुद्धा मिळतो. कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी या योजना फायदेशीर ठरू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना
ही योजना मुलींचे शिक्षण, लग्न आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी ही योजना आहे. त्यांच्या नावे या योजनेत खाते उघडता येते. या योजनेतंर्गत महिलांना वार्षिक 8.2 टक्के व्याज देण्यात येते. तर गुंतवणूकदारांना कलम 80C अंतर्गत कर सवलत देण्यात येते. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा चांगला पर्याय मानण्यात येतो.
टपाल खात्याची महिला सन्मान बचत योजना
2023 च्या अर्थसंकल्पानंतर महिला सन्मान बचत योजना अस्तित्वात आली. ही योजना दोन वर्षांसाठी आहे. या काळात जमा रक्कमेवर चांगले व्याज मिळते. ही योजना नियमित बचत योजनांपेक्षा चांगला परतावा देते आणि महिलांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते. या योजनेत किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.
ज्येष्ठ महिला आणि बँक एफडी
ज्येष्ठ महिलांसाठी 60 वर्षांवरील महिलांसाठी मुदत ठेव (FD) हा चांगला पर्याय आहे. यामध्ये सामान्य एफडीपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळते. SCSS, ज्येष्ठ नागरिक बचत योजना पण अधिक व्याजदर देते. यामुळे सुरक्षेसह व्याजाची हमी मिळते.
किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
महिलांसाठी किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या योजना चांगला पर्याय ठरू शकतात. सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक म्हणून त्याकडे अनेकांचा ओढा आहे. एनएससी 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एक स्थिर व्याजदर देते. ही योजना करमुक्त आहे. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे.
या पाच योजनांद्वारे महिला त्यांचे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेऊ शकतात. त्यावर चांगला परतावा मिळवू शकतात. या योजनेद्वारे कर सवलतही मिळवता येते. या योजनेतील गुंतवणुकीमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास अधिक मदत होते. या योजनांमुळे त्या गुंतवणूक करण्यास आणि पैशांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम ठरतात.
