एका ATM मध्ये किती पैसै असतात, कॅश लोड करणाऱ्या व्हॅनमध्ये कोण-कोण असतं?
एटीएममध्ये दर दोन तीन दिवसांनी रोख रक्कम भरतात. ही रक्कम वाहून नेणाऱ्यांसाठीही नियम आहेत. ते नेमके काय? जाणून घ्या

आपण सगळे सध्या एटीएमचा वापर करतो. एटीएममध्ये बँकेद्वारे पैसे भरले जातात. ते आपण एटीएम कार्डद्वारे काढू शकतो. ठराविक रक्कम प्रविष्ट केल्यानंतर आणि पिन नंबर टाकल्यानंतर आपण आवश्यक रक्कम काढू शकतो, इथपर्यंत आपल्यातील अनेकांना माहिती असेल. पण एटीएम मशीनमध्ये नेमके किती पैसे मावतात. त्यामध्ये रोख भरली जाते ती प्रक्रिया नेमकी कशी असते, बँकेतून रोख घेऊन जाणारे वाहन आणि त्यामध्ये असणारे कर्मचारी या सगळ्यांना कोणते नियम असतात याबद्दल अनेकांना कदाचित माहितीच नसेल. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही बँक सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की, कोणतही बँक कधीच एटीएममध्ये किती रोख रक्कम आहे हे जाहीर करत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती दडवून ठेवली जाते. पण प्रत्येक एटीएममध्ये ठराविक रक्कम नसते. रोख रक्कम ही ज्या त्या एटीएमच्या क्षमतेवर आणि त्यातील नोटांच्या मूल्यांवर अवलंबून असते. म्हणजेच रुपयांच्या नोटांनुसार.
साधारणपणे अशी मान्यता आहे की, प्रत्येक एटीएम मशीनमध्ये ५० लाख रुपयांपर्यंतची रोख भरली जाते. यामध्येही ते एटीएम कोणत्या परिसरात येते त्यावर ही रक्कम अवलंबून असते. याशिवाय तेच रोख रकमेच्या नोटांनुसार त्यातील मूल्य बदलते.
दरम्यान, एटीएमध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी कॅसेट नावाच्या ट्रेचा वापर केला जातो. हे ट्रे धातूंपासून बनवलेले असतात. प्रत्येक एटीएममध्ये असे चार ट्रे असतात. यामध्येच नोटांचे बंडल ठेवलेले पाहायला मिळतात. दरम्यान, एका ट्रेमध्ये २५०० नोटा मावू शकतात. त्यामुळे एकूण चार कॅसेटचा विचार केल्यास त्यात १०,००० नोटा मावतात.
त्यामुळे आता प्रश्नाचं उत्तर इथेच आहे की, नोटा जर पाचशेच्या असतील तर एका एटीएमध्ये ५० लाख रुपये असतात. चारही कॅसेट ट्रे भरलेले असतील तर ही रक्कम असू शकते. पण नोटा १००, २०० च्या असतील तर त्याचे समिकरण बदलले जाते. दरम्यान, काही एटीएमध्ये पैसे भरण्याची सुविधाही दिलेली आहे. तो भाग वेगळा आहे.
आरबीआयच्या मार्गदर्श तत्वांनुसार एकावेळी ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाहून नेता येत नाही. ज्या कॅश व्हॅनमधून रोख रक्कम नेली जाते ती व्हॅन जीपीएस सुस्सज असावी लागते. मोठ्या शहरांमध्ये रात्री ९ च्या आधी आणि छोट्या शहरांमध्ये रात्री ६ आधीच रोख रक्कम एटीएममध्ये भरली जाते. यावेळी कॅश व्हॅनच्या सुरक्षेसाठी एक चालक, दोन सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि दोन एटीएम अधिकारी तथा संरक्षक असावे लागतात.
