Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, विमान दुर्घटनेनंतर इराण-इस्त्रायल युद्धाने स्टॉक मार्केटला भोवळ
Stock Market Crash : अहमदाबाद विमान अपघात आणि इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळ शेअर बाजाराला बसल्या. भारतीय शेअर बाजार प्री-ओपनिंग सत्रातच धराशायी झाला. भूराजकीय वादासह विमान अपघाताने गुंतवणूकदार धास्तावला. बाजाराला फटका बसला.

अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात आणि मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग यामुळे भारतीय बाजाराला कापरे भरले. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. कालही बाजार गडगडला होता. टाटा कंपनीच्या शेअरला फटका बसला होता. तर आज 13 जून रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. इस्त्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम दिसून आला. स्टॉक मार्केट कोसळले. सेन्सेक्समध्ये 1,264 अंकांची घसरण आली. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 80,427 अंकावर उघडला, तर निफ्टी 415 अंकांच्या घसरणीसह 24,473 स्तरावर पोहचला. बाजार उघडण्यापूर्वीच्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले. बाजाराला भूराजकीय वादाची चिंता सतावत आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीला हादरा
सुरुवातीच्या व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजार दबावात दिसला. सकाळी 9:16 वाजता सेन्सेक्स 1,136.88 अंक म्हणजे 1.55% घसरून 80,555.09 अंकावर आला. तर निफ्टी 332.95 अंक म्हणजे 1.67% घसरून 24,555.25 अंकावर ट्रेड करत होता. अहमदाबाद येथील एअर इंडिया अपघात आणि इस्त्रायल-इराण संघर्ष यांच्यामुळे शेअर बाजाराला कापरे भरले. गुंतवणूकदार चिंतेत सापडले.
एअरलाईन्स कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताचा थेट परिणाम एव्हिएशन क्षेत्रावर दिसून आला. फ्लाईट सेफ्टीविषयी चिंता वाढल्या आहेत. इंडिगो, स्पाईसजेटच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या व्यापारी सत्रात जवळपास 5 टक्क्यांची घसरण दिसून आली. गुरुवारी या भीषण विमान अपघातात 242 हून अधिक प्रवाशांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. गेल्या एका दशकातील हा सर्वात मोठा विमान अपघात मानण्यात येत आहे.
याशिवाय बोईंग कंपनीचा शेअर जवळपास 5 टक्क्यांनी घसरला. या घसरणीसह शेअर 203.60 डॉलरवर बंद झाला. इंटरग्लोब एविएशनचा (इंडिगो) शेअर 3.31% घसरणीसह 5446.35 रुपयांवर बंद झाला होता. तर स्पाईसजेटचा शेअर 2.40% घसरला होता. तो 44.40 रुपयांवर बंद झाला होता. या अपघातानंतर इंडिगोचा शेअर 5420 रुपयांवर घसरला. तर स्पाईसजेटचा शेअर 44.29 रुपयांपर्यंत खाली आला.
सेन्सेक्सचे 30 शेअर लाले-लाल
आज सकाळच्या सत्रात बाजार उघडताच सेन्सेक्सचे 30 शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. तर निफ्टी 50 मधील 50 कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीचा शेअर वधारला. तर इतर 49 कंपन्यांचे शेअर घसरले. आज सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रोचा शेअर सर्वाधिक 2.77 टक्क्यांच्या घसरणीसह उघडला.