यूक्रेन-रशियात वाद सुरु, झळ खिश्याला; पेट्रोल-डिझेल महागणार, गॅस भाववाढीचा भडका?
रशिया आणि यूक्रेन वादामुळे सोने (Gold), चांदी पासू कच्च्या तेलाच्या (Crude Oil)भावात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) आज (गुरुवारी) सोन्याची किंमत वर्ष 2022 च्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे.

नवी दिल्ली: यूक्रेन (Ukraine) व रशिया (Russia) वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशिया-युक्रेन वादामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (Global Market) उलथापालथ होण्याची शक्यता अर्थ जाणकरांनी वर्तविली आहे. रशिया आणि यूक्रेन वादामुळे सोने, चांदी पासू कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर आज (गुरुवारी) सोन्याची किंमत वर्ष 2022 च्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल 100 डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आगामी काळात कच्च्या तेलाच्या भावाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कच्च्या तेलाची भाववाढ?
युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. आज (गुरुवारी) कच्च्या तेलाच्या किंमती 101.09 डॉलर प्रति बॅरलच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा भाव 101.09 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाचा विक्रमी भाव ठरला आहे. रशिया-युक्रेन वाद शमण्याची चिन्हे दिसत नसल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीला बसला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं क्रूड तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविला होता. देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा देखील भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताची आर्थिक घडी फिस्कटणार?
कच्च्या तेलाच्या भाववाढीचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताला अधिक खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या गंगाजळीवर अधिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या मोठ्या आयातदार देशांमध्ये भारताचा समावेश होतो. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल 100 डॉलरवर स्थिर राहिल्यास थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भावावर होऊ शकतो. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅसही पेटणार?
रशिया-युक्रेन वादामुळं केवळ सोने-चांदी, कच्चे तेल नव्हे तर अन्य गोष्टीही महाग झाल्या आहेत. नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 6.25 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. यासोबतच निकेलच्या किंमतीत 2.01 टक्क्यांची भाववाढ नोंदविली गेली आहे. अल्युमिनियमचे भाव पूर्वीच्या तुलनेत 2.00 टक्क्यांनी वाढले आहे.
