नवी मुंबईत बांगलादेशी तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या; तीन आठवड्यांनी कुजलेला मृतदेह मिळाला

7 डिसेंबरला कळंबोली येथील फ्लॅटमध्ये लिपी सागर शेख उर्फ रीना शेख हिचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:57 AM, 17 Dec 2020
नवी मुंबईत बांगलादेशी तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या; तीन आठवड्यांनी कुजलेला मृतदेह मिळाला

नवी मुंबई: कळंबोली परिसरात राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीची तिच्या प्रियकराकडून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. (26 Year old girl murdered by boyfriend in Navi Mumbai)

प्राथमिक माहितीनुसार, 7 डिसेंबरला कळंबोली येथील फ्लॅटमध्ये लिपी सागर शेख उर्फ रीना शेख हिचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिच्या हत्येला साधारण तीन आठवडे उलटून गेले होते. रीना शेख हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्याने तिचा मृतदेह फ्लॅटमध्ये सोडून पळ काढला होता.

याप्रकरणी पोलिसांनी आता तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. रीनाचा प्रियकरही बांगलादेशी नागरिक आहे. रीनाचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिची हत्या केली होती.

मैत्रिणींमुळे रीनाच्या मृत्यूचा खुलासा

रीना ही आपल्या दोन मैत्रिणींसोबत कळंबोली येथील फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या दोन्ही मैत्रिणीही बांगलादेशी होत्या. लॉकडाऊनच्या काळात या तिघींच्या नोकऱ्या गेल्याने त्या बेरोजगार होत्या. तेव्हा रीनाच्या दोन्ही मैत्रिणी बांगलादेशला परतल्या होत्या. तेव्हापासून रीना फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती.

काही दिवसांपूर्वी रीनाच्या मैत्रिणी नोकरीसाठी नवी मुंबईत परतल्या. तेव्हा फ्लॅट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रीनाला अनेक फोन करूनही तिने उत्तर दिले नाही. त्यानंतर रीनाच्या मैत्रिणींनी फ्लॅटच्या मालकाला फोन करून त्याच्याकडून फ्लॅटची चावी मागून घेतली. तेव्हा घरमालकाने रीना अजूनही फ्लॅटमध्येच राहत असल्याचे सांगत चावी तिच्याकडेच असल्याचे म्हटले. अखेर या फ्लॅटच्या ब्रोकरकडे असलेल्या डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने फ्लॅट उघडण्यात आला. तेव्हा रीनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

लॉकडाऊनच्या काळात रीना बॉयफ्रेंडसोबत

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांना रीनाचे बांगलादेशी तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. रीनाच्या मैत्रिणी लॉकडाऊनमध्ये बांगलादेशला निघून गेल्यानंतर तो रीनासोबत फ्लॅटमध्ये राहत होता. रीनाच्या मृत्यूनंतर तो गायब आहे.

चौकशीदरम्यान रीनाचा प्रियकर भारतातच असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी आपले खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावून रीनाच्या प्रियकराला शोधून काढले. त्याची चौकशी केली असता सर्व प्रकाराचा खुलासा झाला.

रीनाचे बाहेर आणखी एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध असून ती मला फसवत होती. त्यामुळे आपण रागाच्या भरात तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर फ्लॅट बंद करून आपण पळ काढला, अशी कबुली रीनाच्या प्रियकराने पोलिसांना दिली.

(26 Year old girl murdered by boyfriend in Navi Mumbai)