काकू बघा ना, माझी आई बेशुद्ध झाली ! चिमुकल्याचे शब्द ऐकून घरात घेतली धाव आणि…
त्यांचा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला की आई बेशुद्ध झाली आहे.तिच्यासाठी काहीतरी करा ना.. आम्ही ताबडतोब तिच्या घरी गेलो आणि समोरचं दृश्य पाहून... महिलेने काय सांगितलं ?

मध्य प्रदेशातील इंदूर क्षिप्रा पोलीस स्टेशन परिसरात, कौटुंबिक वादातून एका महिलेने तिच्या तीन मुलांसह विष प्राशन केले. महिलेने प्रथम मिठाईमध्ये विष मिसळले आणि ते तिच्या तीन मुलांना खायला दिले आणि नंतर ते स्वतःदेखील खाल्लं. मात्र शेजाऱ्यांना ही गोष्ट कळताच ते मदतीसाठी धावले आणि ती महिला आणि तिन्ही मुलांना तातडीने इंदोरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आई व मुलांची सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांच्यावर अद्यापही लक्ष ठेवले जात आहे.
हे प्रकरण क्षिप्रा पोलिस स्टेशन परिसरातील मंगलिया गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष प्राशन करणाऱ्या महिलेचं नवा अन्नू असं असून तिने तीन मुलं, आकाश, राज आणि पवन यांनाही विषारी पदार्थ घालून मिठाई खायला दिली. या सर्वांना उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
प्राथमिक तपासात असं आढळलं की, महिला आणि तिच्या पतीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. पती अनेकदा कामानिमित्त शहराबाहेर राहतो. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर महिलेने हे विनाशकारी पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच शिप्रा पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना रुग्णालयात पाठवले. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काकू माझी आई बेशुद्ध झालीये
याबद्दल त्या महिलेच्या शेजारी, रचना मालवीय यांनीही माहिती दिली. म्हणाल्या, ‘तिचा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, काकू माझी आई बेशुद्ध पडली आहे. प्लीज तुम्ही पहा ना, काहीतरी करा ना. ते ऐकून आम्ही धावतच तिच्या घरात गेलो आणि त्या महिलेची विचारपूस केली. ती म्हणाली की तिने उंदीर मारण्याचे विष खाल्लं आहे आणि तेच तिच्या तिन्ही मुलांनाही दिलंय.’ पण तू असं का केलंस असा विचारल्यावर ती महिला म्हणाली की, माझा नवरा माझं काहीच ऐकत नाही, भांडत असतो नेहमी, त्यामुळेच मी विष घेतलं.
या महिलेचा पती कामानिमित्त बाहेर असतो, गाडी चालवतो, त्यामुळे 8-10 दिवसांनीच घरी येतो. त्या मुलांनी सांगितलं की आई मिठाई घेऊन आली होती, तिने त्यात काहीतरी मिसळलं आणि आम्हाला खायला दिलं, अशी माहिती शेजारच्या महिलेने दिली.
प्रकृती धोक्याबाहेर
मंगलिया पोलिस स्टेशनचे प्रभारी विश्वजीत सिंह तोमर यांनी सांगितले की, महिलेचा तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद होता. पती ड्रायव्हर आहे. तो दर 8-10 दिवसांनी येतो, त्यामुळे पती-पत्नीमध्ये या मुद्द्यावरून भांडणे व्हायची. यामुळेच तिने मिठाईमध्ये उंदीर मारण्याचे विष मिसळले आणि मुलांना ते खायला दिल्यानंतर ते स्वतःही खाल्ले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वजण धोक्याबाहेर आहेत, असे पोलिसांनी सांगितलं.
