रुमाल बांधून आला, तोंड दाबले अन्… त्यानंतर मुलीने जे केले ते पाहून सर्वजण झाले हैराण
महाविद्यालयातून परतणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न फसला. तरुणीच्या धाडसामुळे आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकताच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता भंडारा येथील वरठी येथे आणखी एक लाजिरवाणी घटना घडली आहे. येथे एका नराधमाने महाविद्यालयातून परतणाऱ्या मुलीचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलीच्या धाडसामुळे आरोपीचा कट फसला. याप्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 मार्च २०२५ रोजी घडली. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेज संपवून घरी परतत होती. तेव्हा तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण तिच्या मागे येत असल्याचे तिने पाहिले. धोका ओळखून मुलीने चालण्याचा वेग वाढवला. मात्र, ती सुनसान भागात पोहोचताच तरुणाने तिचा रस्ता अडवला. तरुणाने तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. त्यानंतर त्याने मुलीचे दोन्ही पाय पकडून तिला जवळच्या पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र तिने हिंमतीने पायाने आरोपीच्या तोंडावर जोरदार लाथ मारली.
मुलीच्या हिंमतीचे कौतुक
लाथ मारताच आरोपीच्या चेहऱ्यावरील रुमाल खाली पडला. त्याचा चेहरा उघडा पडला. त्यानंतर मुलगी जोरजोरात ओरडू लागली. आजूबाजूला कोणी नसल्यामुळे तिचा आवाज ऐकायला कोणीच नव्हते. मात्र उघडलेला चेहरा आणि मुलीच्या आरडाओरड्याने घाबरून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घाबरलेली मुलगी पळत घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पीडिते कडून माहिती घेत आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत मात्र भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.