MNS Raj Thackeray : मुंबई नाही गांधीनगर आहे, इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंच नाव घेऊन शिवीगाळ VIDEO
MNS Raj Thackeray : 'हे बृहन्मुंबई नाही, गांधी नगर आहे इथे राज ठाकरेंची नाही, भय्यांची चालणार' मनसेला थेट चॅलेंज करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज ठाकरे काल परळ येथे मालवणी जत्रोत्सवात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीजनांना 'रात्रवैऱ्याची आहे, गाफील राहू नका' असं सांगितलं.

ठाण्यात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेऊन शिवीगाळ केली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. ठाण्यातील गांधीनगरमध्ये मनसेची नाही, भय्यांची चालणार असं हा रिक्षा चालक म्हणतो. किरकोळ वादातून या रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. या रिक्षा चालकाला ठाणे चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षा चालकाने राज ठाकरे, अविनाश जाधव यांचं नाव घेत शिवीगाळ केली. हे बृहन्मुंबई नाही, गांधी नगर आहे इथे राज ठाकरेंची नाही, भय्यांची चालणार असं हा रिक्षा चालक उद्धटपणे बोलताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संपूर्ण देशाला माहिती आहे, कोण भाषावाद, प्रांतवादाची प्रक्षोभक विधानं करुन माथी भडकवतय. तुम्ही स्वत:च्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत पाठवणार. तुमची मुलं जर्मन, फ्रेंच भाषा शिकणार. जावेद अख्तर शिवाजी पार्कवर तुमच्यासमोर हिंदीमध्ये बोलतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. इतकी दुटप्पी, ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही” अशी टीका अमित साटम यांनी केली.
निवडून आले म्हणजे बालेकिल्ला होतो का?
“ठाणे हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. निवडून आले म्हणजे बालेकिल्ला होतो का?. आज आमच्याकडे पण हजारो पोरं आहेत, मराठी माणसासाठी अंगावर जाणारी. ठाणे हा मराठी माणसाचा बालेकिल्ला असून आम्ही रक्षणकर्ते आहोत” असं ठाण्यातील मनसेचे प्रमुख अविनाथ जाधव म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे काल परळ येथे मालवणी जत्रोत्सवात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठीजनांना ‘रात्रवैऱ्याची आहे, गाफील राहू नका’ असं सांगितलं. “आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला कोण खरे, कोण खोटे मतदार यावर लक्ष ठेवा. ही शेवटची महापालिका निवडणूक असू शकते. गाफील राहिलो तर महापालिका गेली असं समजा” असं राज ठाकरे उपस्थितांना म्हणाले. अजून महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका लागू शकतात.
