समोशाची ऑर्डर दिली, वॉशरूमचा बहाणा करून नववधू गायब, त्या बाजारात काय घडलं?
चंदौली जिल्ह्यातील मुगलसरायमध्ये लग्नाच्या दहा दिवसानंतर एका नवरीचे बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. नवरा शमशेर चौहान याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नवरी खुशी बाजारात शॉपिंग करताना गायब झाली. पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व अँगलने चौकशी केली जात आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील मुगलसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या 10 दिवसातच नवरी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाजारात गेल्यावर तिथूनच नवरीने धूम ठोकल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नवरीचा शोध सुरू केला आहे. पीडित नवरा शमशेर चौहान हा सैदपुरा गावातील रहिवासी आहे. 4 जून रोजी त्याचं लग्न झालं होतं. मवई खुर्द गावातील खुशीसोबत त्याचं लग्न झालं होतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. पण 14 जून रोजी नवरीच गायब झाल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शमशेरने दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी खुशीने डोकं दुखत असल्याचं सांगून डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दोघे डॉक्टरकडे गेले. तिकडे गेल्यावर बाजारात शॉपिंग करण्याची खुशीने इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही दोघे दीनदयाल उपाध्याय नगर (मुगसलराय) बाजारात पोहोचलो. खरेदी केल्यानंतर काली माता मंदिराजवळील एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. तिथे खुशीने समोस्याची ऑर्डर दिली. त्यानंतर वॉशरूमला जायचं म्हणून ती हॉटेलाच्या वर गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही, असं शमशेरने सांगितलं.
बाजारातही शोधलं
मी बराच वेळ ती येण्याची वाट पाहिली. पण ती आली नसल्याने मी हॉटेलच्यावर जाऊन पाहिलं. तिथे ती नव्हती. त्यानंतर हॉटेलचा तिसरा फ्लोअरही चेक केला. तिथेही ती नव्हती. त्यानंतर मी संपूर्ण बाजारात शोध घेतला. अनेकांना विचारलं, पण तिचा कुठेच शोध लागला नाही. त्यानंतर मी घरी आलो आणि घरच्यांना सर्व हकीकत सांगून थेट पोलिसात तक्रार दिल्याचं त्याचं म्हणणं आहे.
प्रत्येक अँगलने चौकशी
बायको सापडत नसल्याचं पाहून शमशेर घरी आला. त्याने घरच्यांना सर्व सांगितलं आणि पोलीस ठाण्यात येऊन खुशी हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनाही फोन केला. तेव्हा खुशी घरी आली नसल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलं. डेप्युटी एसपी राजीव सिसोदिया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही खुशीचा शोध घेत आहोत. प्रत्येक अँगलने तपास करत आहोत. तिचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं सिसोदिया यांनी सांगितलं.