जमिनीसाठी रक्ताचं नातं संपवलं, लहान भावाने केलं असं काही…; जेजुरी हादरली
जेजुरीजवळील मावडी येथे ७८ वर्षीय चांगदेव भामे याने जमिनीच्या वादातून आपल्या ८२ वर्षीय मोठ्या भावाचा खून केला. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली. भांडण जमिनीच्या वाटणीवरून सुरू झाले होते. हा प्रकार महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आणखी एक उदाहरण आहे, ज्यामुळे नात्यांची किंमत शून्य होत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता नात्याला काळीमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक घटना जेजुरी जवळील मावडी येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून एका ७८ वर्षीय सख्या भावाने ८२ वर्षीय मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या थरारक घटनेने दोन भावांच्या नात्याची शोकांतिका समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी १ ऑगस्ट २०२५ रोजी जेजुरी जवळील मावडी या ठिकाणी एका बाजरीच्या शेतात ज्ञानदेव लक्ष्मण भामे (८२) यांचा मृतदेह आढळला. पहिल्यांदा हा मृत्यू नैसर्गिक असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, जेजुरी पोलिसांना याबद्दल काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. यानंतर २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानदेव भामे आणि त्यांचा लहान भाऊ चांगदेव भामे (७८) यांच्यात शेतजमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. चांगदेव भामे यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी ज्ञानदेव भामे रस्ता देत नव्हते, त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडण होत होते. याच वादातून चांगदेव भामे यांनी मोठ्या भावाचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी ज्ञानदेव यांना दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीतच ज्ञानदेव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला. त्यात त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हत्येची पुष्टी झाली.
आरोपी २४ तासांत जेरबंद
जेजुरी पोलिसांनी या घटनेची गंभीरता ओळखून तपास सुरू केला. त्यांना चांगदेव भामे आणि ज्ञानदेव भामे यांच्यातील वादाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी चांगदेव यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे मावडी गावात आणि जेजुरी परिसरात शोककळा पसरली आहे. अशाप्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केल्याने परिसरातील लोक हादरून गेले आहेत. पैशांसाठी आणि जमिनीसाठी नात्याची किंमत शून्य झाली आहे का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. याप्रकरणी आरोपी चांगदेव भामे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
