नाशिकमध्ये धक्कादायक घटना, नामांकित बिल्डरांकडून पोलीस आयुक्तालयच हडपण्याचा प्रयत्न
नाशिकमध्ये काही नामांकित बिल्डरांनी संगनमत करून थेट पोलीस आयुक्तालयच हडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी शहरातील 21 नामांकित बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राज्याच्या विविध भागात भूमाफिया सर्वसामान्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. मात्र नाशिकमध्ये काही नामांकित बिल्डरांनी संगनमत करून थेट पोलीस आयुक्तालयच हडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी शहरातील 21 नामांकित बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील जागा
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील शरणपूर गावठाण परिसरात एक जुने नाशिक पोलिस आयुक्त कार्यालय आहे. ही जागा नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनच्या मालकीची आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेली ही जागा खुप महत्वाची आहे. सध्याचे उपायुक्त कार्यालय असलेल्या या जागेमध्ये नुकतेच मुख्यमंत्र्यांनी यावर कॉमन मॅन च्या पुतळ्याच उद्घाटन केले होते.
जागेची किंमत ३०० कोटी
शरणपूर गावठाण परिसरातील या जागेची किंमत जवळपास तीनशे कोटी रुपये आहे. मात्र ही जागा अवघ्या काही कोटींमध्ये आपल्या मालकीच्या नावे करण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यवसायिकांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी शहरातील 21 नामवंत बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत
‘या’ मालमत्तांच्या व्यवहारांवर बंदी
मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन समुदायाच्या या ट्रस्ट कडून पोलिसांनी ही जागा गेल्या वीस वर्षापासून भाड्याने घेतलेली आहे. जवळपास तीन हजार एकर असलेल्या विविध मालमत्ता एनडीटीए नावाने असल्याने वादग्रस्त म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी या मालमत्तांच्या व्यवहारांवर बंदी आणली होती.
धर्मदाय आयुक्तांच्या संगणमताने जागा बळकावण्याचा प्रयत्न
या मालमत्तांच्या सातबाऱ्यांवर तसे शिक्केही मारण्यात आले होते, मात्र नवीन एनडीसी कंपनी स्थापन करून धर्मदाय आयुक्तांच्या संगणमताने काही जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांचे उद्योग समोर आणण्यासाठी महसूल प्रशासनातून अहवाल मागवले होते. या अहवालानुसार ही संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र १९४५ आणि ५४ च्या खरेदी विक्री रेकॉर्डनुसार ही जागा केवळ एनडीटीएची असल्याची माहिती समोर आली आहे.