पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव…अख्खं घरच खुनाच्या कटात, काय घडलं नागपूरच्या त्या बाथरूममध्ये?
नागपुरात बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने भावाचा मृत्यू झाल्याचा थोरल्या भावाचा बनाव अखेर पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर उघड झाल्याने आणि संपूर्ण कुटुंबालाच हत्ये प्रकरणात आरोपी केल्याने खळबळ उडाली आहे.

बाथरुममध्ये त्याचा मृतदेह पडला होता. मोठ्या भावाने सांगितले की आपला भाऊ बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने त्याच्या डोक्याला नळ लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना या प्रकरणात लहान भावाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. त्यानंतर ज्यावेळी उत्तरीय तपासणी अहवाल आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आणि अख्खं कुटुंबच खूनाच्या कटात सामील असल्याचे आढळले.
नागपूरातील मानकापूर परिसरात शिवनगरमधील ईरोज सोसायटीत एका घराच्या बाथरुममध्ये 2 सप्टेंबर रोजी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या मृताचे नाव सुधीर पंढरीनाथ खंडारे असे आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमला पाठवला तेव्हा त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढल्याने पोलिसांनी पुन्हा तपास सुरु केला. आणि १३ दिवसांना हा कुटुंबियांनी सांगितल्या प्रमाणे हा पाय घसरुन मृत्यू झालेला नसून खूनच असल्याचे स्पष्ट झाले.
शेजारच्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या घरात मृत सुधीर (40) हा काहीही काम करत नव्हता असे पोलिसांना समजले. त्याचा मोठा भाऊ योगेश खंडारे (56) प्रॉपर्टी डीलर होता.त्याची पत्नी रुपा योगेश खंडारे (52 ) त्याचा आणखी एख लहान भाऊ राजेश खंडारे (43) हा अपंग होता. आणि वृद्ध आई कौशल्या खंडार ( 70) असे कुटुंब होते. सुधीर खंडारे कोणतेही काम करत नव्हता आणि त्याला दारुचे व्यसन होते. त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
१३ दिवसांनी यातील सत्य बाहेर
तब्बल १३ दिवसांनी यातील सत्य बाहेर आले आणि आरोपी म्हणून मोठा भाऊ योगेश खंडारे, त्याची पत्नी रुपा आणि भाऊ राजेश खंडारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सुधीरची वृद्ध आई आणि एका अल्पवयीनलाही आरोपी करण्यात आले आहे. कुटुंबीयांकडूनच घरात घडलेली ही निर्दयी हत्या उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस आणखी तपास करत आहेत.
