अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी ‘कोब्रा’ अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव

फक्त हजार रुपयांसाठी अपार्टमेंटमध्ये निघालेला कोब्रा नाग चक्क घराच्या दारावर अडकावल्याने नाशिकमध्ये रहिवाशांची भीतीने गाळण उडाली.

अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी 'कोब्रा' अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव
नाशिकमध्ये सर्पमित्राने चक्क कोब्रा घराच्या दारावर अडकावला.


नाशिकः फक्त हजार रुपयांसाठी अपार्टमेंटमध्ये निघालेला कोब्रा नाग चक्क घराच्या दारावर अडकावल्याने नाशिकमध्ये रहिवाशांची भीतीने गाळण उडाली. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी फाटा भागातल्या एका अपार्टमेंटमधल्या नागरिकांना दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या पार्किंगमध्ये साप दिसला होता. त्यांनी पुन्हा साप निघाला तर उपयोगी पडेल म्हणून इंटरेनटवरून सर्पमित्राचा नंबर शोधून ठेवला. झालेही तसेच. पुन्हा एकदा अपार्टमेंटमध्ये साप निघाला. तेव्हा नागरिकांनी सर्पमित्राला फोन करून साप पकडायला बोलावले. सर्पमित्राने अपेक्षेप्रमाणे साप पकडला. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, इथून पुढेच त्यांची भीतीनी गाळण उडाली. कारण सर्पमित्राने पकडलेला साप हा अत्यंत विषारी असा कोब्रा होता. त्याने हा साप पकडण्याचे एक हजार रुपये मागितले. नागरिकांनी दोनचारशे रुपये देऊ असे सांगितले. मात्र, इतके कमी पैसे घ्यायला सर्पमित्र तयार होईना. आणि अपार्टमेंटमधील नागरिकांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे सर्पमित्राचा संताप अनावर झाला. त्याने चक्क पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या दाराला पकडलेला भयंकर विषारी कोब्रा अडकावला आणि तेथून पोबारा केला. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये पुन्हा खळबळ माजली. तिथून साप दुसरीकडे निसटला, कुणाच्या घरात शिरला तर कसे असा प्रश्न पडला. अख्खी सोसायटी त्या प्लॅटजवळ जमा झाली. शेवटी नागरिकांनी दुसऱ्या सर्पमित्राचा नंबर मिळवला. त्यांना संपर्क साधला. यात संध्याकाळ झाली. त्यानंतर दोन सर्पमित्र आले आणि त्यांनी तो कोब्रा पकडून नेला. झाल्या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रंचड भीती आणि संताप आहे. सर्प पकडण्याच्या नावाखाली अनेकजण पैसे उकळत आहेत. पैसे नाही दिले, तर असे भयंकर प्रकार करत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली किंवा नागरिकांनी घटनेचे चित्रीकरण आमच्याकडे पाठवले तर नक्कीच संबंधितांवर कारवाई करू, असा इशारा नाशिक पश्चिमच्या उपवनसंरक्षकांनी दिला आहे.

सर्पमित्रांचा सुळसुळाट

नाशिकमध्ये सध्या सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला आहे. कोणीही येते आणि आपले सर्पमित्र असल्याचे कार्ड तयार करते. हे तरुण साप पकडायला जातातही. मात्र, अनेक ठिकाणी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केली जाते. हे पाहता सर्पमित्रांची यादीच प्रशासनाने तयार करावी. ती यादी प्रत्येक भागानुसार जाहीर करावी. यामुळे नागरिकांच्याही सोयीचे होईल, अशी मागणी नागरिकांंनी केली आहे. अनेक ठिकाणी बोगस सर्पमित्र आहेत. ते साप पकडण्याचे धाडस करतातही. मात्र, त्यांना शास्त्रशुद्ध माहिती नसते. यामुळे एखाद्याचा साप पकडताना हकनाक बळीही जावू शकतो.

इतर बातम्याः

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी; विभागीय आयुक्तांच्या सूचना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI