कपडे काढायला लावले, डंबेल्स उचलायला सांगितले, क्रूर रॅगिंगचा कळस
रॅगिंगचा एक क्रूर प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांपासून हे सिनियर्स विद्यार्थी प्रथम वर्षाच्या ज्युनियर्स विद्यार्थ्यांना त्रास देत होते. या प्रकरणात आरोपींनी ज्युनियर विद्यार्थ्यांना नग्न अवस्थेत उभे राहण्यास भाग पाडले, पुढे त्यांनी त्या जुनियर विद्यार्थ्यांना जड डंबल्सही उचलण्यास सांगितले आणि क्रूरतेचा कळसच गाठला.

कॉलेजमध्ये सिनियर्सचा ज्युनियर विद्यार्थ्यांवरील दबदबा तुम्हाला माहितीच असेल. पण, याचं रुपांतर रॅगिंगमध्ये होतानाही अनेक ठिकाणी दिसून येतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात सिनियर्सने ज्युनियर विद्यार्थ्यांना नग्न अवस्थेत उभे राहण्यास भाग पाडले, पुढे तर त्यांनी क्रूरतेचा कळसच गाठला. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
केरळमधील कोट्टायम येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी प्रथम वर्षाच्या ज्युनियर विद्यार्थ्यांना सतत त्रास देत होते. हे प्रकरण काही प्रमाणात चिघळले आणि काही विद्यार्थ्यांना ते सहन करण्यासारखे वाटले नाही तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर हा सपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीनुसार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पीडित ज्युनियर विद्यार्थ्यांनी सिनियर्सवर केला आहे. कॉलेजमधील सिनियर्सनी (आरोपी) ज्युनियर्स विद्यार्थ्यांना नग्न अवस्थेत उभे राहण्यास भाग पाडले आणि जड डंबेल उचलण्यास सांगितले. पुढे शारीरिक आणि मानसिक छळ केला. इतकंच नाही तर कंपास सारख्या वस्तूंनी जखमाही केल्या. त्याच जखमेवर लोशन लावण्यात आलं. यामुळे अधिक वेदना झाल्या. कॉलेजमध्ये ही अमानुषता बराच काळ सुरू होती, पण भीतीपोटी पीडित आतापर्यंत गप्प बसले होते.
अखेरच धाडस केलेच
आरोपी म्हणजे सिनियर्स दर रविवारी ज्युनियर्स विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत होते आणि दारू खरेदी करण्यास सांगत होते, असा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. ज्युनियर्सनी नकार दिल्यास त्यांना सिनियर्स मारहाण करायचे. वाढत्या छळाला कंटाळून अखेर तीन विद्यार्थ्यांनी धाडस करत केरळच्या कोट्टायम गांधीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर पाच विद्यार्थ्यांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून कॉलेज प्रशासनाकडून उत्तरही मागवण्यात आले आहे. सिनियर्स-ज्युनियर्सचे रूपांतर हिंसा आणि अमानुषतेत होत असताना रॅगिंगचे कटू सत्य या घटनेने पुन्हा एकदा उघड केले आहे.
रॅगिंग झाल्यास काय करावे?
रॅगिंगसारख्या समस्यांनी ग्रस्त विद्यार्थी नॅशनल अँटी-रॅगिंग हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतो.
हेल्पलाईन नंबर- 1800-180-5522 {24×7 टोल फ्री) वर कॉल करू शकतात.
तसेच विद्यार्थी रॅगिंगविरोधी हेल्पलाइन ईमेल helplin@antiragqins.in मेल करू शकतो.
त्याचबरोबर इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही antiragging.in जाऊ शकता. याशिवाय विद्यार्थी सेंटर फॉर यूथच्या (C4Y) मोबाइल क्रमांकावर 9818044577 कॉल करू शकता.
