कार चोरायला गेला आणि स्वत:च आत अडकला ; लोकांनी मग असे हात साफ केले ना…
Delhi Crime News : मध्यरात्रीच्या सुमारास काही चोरटे एक कार पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यापैकी एक हा कारमध्येच अडकला. स्नाथिनक नागरिकांच्या हे लक्षात येताच सर्वजण तिथे गोळा झाले. जमावाला पाहून इतर चोरट्यांनी पळ काढला, पण एकजण कारमध्येच अडकला होता.

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये चोरी-मारीच्या (theft) घटना खूपच वाढल्या आहेत. दररोज चोरी, लूट, गुन्ह्याची एखादी तरी तक्रार पोलिसांत येतेच. मात्र राजधानीतून आता चोरीचा अजब मामला समोर आला आहे. चोरी करता करता चोरच अडकल्याची (thief trapped inside the car) आणि फसल्याची एक वेगळीच घटना घडली आहे. त्यानंतर स्थानिकांनी त्याची जी हालत केली ती ऐकून तर तुम्ही डोक्यालाच हात लावाल.
भलस्वा डेअरी परिसरातील रहिवासी वस्तीच्या रस्त्यावर दोन चोरटे चोरी करण्यासाठी आले असता त्यांची नजर तेथे उभ्या असलेल्या कारवर पडली. त्यांनी ती कार चोरण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यापैकी एक चोर तर आतमध्येच अडकला. चोरट्यांची चाहूल लागताच तिथे लोकांची एकच गर्दी झाली. हे पाहून दुसऱ्या चोरट्याने पळ काढला, मात्र कारमध्ये अडकलेल्या चोरट्याला लोकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून त्यांनी मास्टर की, ड्रिल मशीन आणि डिजिटल डिव्हाईस सह इतर उपकरणेही जप्त केली.
गाडीतच फसला चोर
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक गुलाब सिंह राठौर हे त्यांच्या कुटुंबियांसह मुकुंदपूरच्या प्रगती एन्क्लेव्हच्या भाग 2 मध्ये राहतात. शनिवारी ते घरी परत आले तेव्हा त्यांची ब्रेझा कार घरासमोरील रस्त्यावर उभी केली. रात्री 2 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर एकच गोंधळ सुरू झाला, खूप आवाज येत होता. काय झालं हे पाहण्यासाठी गुलाब सिंह हे बाहेर तेव्हा अनेक लोकांनी त्यांची कार घेरल्याचे दिसले, जवळ जाऊन पाहिले असता कारमध्ये एक चोर अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांनी सुरू केला दुसऱ्या चोराचा शोध
त्यानंतर स्थानिकांनी त्या चोराला कारमधून बाहेर काढले आणि त्याला बेदम चोप दिला. आपला साथीदार आत अडकल्याचे पाहून दुसऱ्या चोराने बाईक तिथेच सोडून पोबारा केला होता. पहिल्या चोराला पकडल्यावर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सापडलेल्या बॅगेमध्ये डिजिटल डिव्हाईस, ड्रिल मशीन , सेफ्टी पिनवाली वायर आणि एक मास्टर की जप्त करण्यात आली. पोलिसांनी पहिल्या चोराला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा कसून शोध घेण्यात येत आहे.
