मध्य रेल्वेत बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश, घाटकोपर स्थानकात एका हस्तकाला लाच स्वीकारताना अटक
मध्य रेल्वेत सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत पैसे उकळणाऱ्या एका दलालाला 25 हजाराची लाच स्वीकारताना मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने घाटकोपर स्थानकात सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने आपला रेल्वेत खूप मोठा वशीला असून दोन महिन्यात सहा लाख दिल्यास नोकरी लावून देण्याची आमीष दाखविले होते.
मुंबई | 14 डिसेंबर 2023 : सहा लाख रुपये दिल्यास रेल्वेत दोन महिन्याच्या आत नोकरी लावून देईन अशा आमीषाला भुलून तक्रारदाराने दलालास पैसै दिले. परंतू नोकरी लागण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने तक्रारदाराने नरसिंह पै याच्या विरोधात मध्य रेल्वेकडे तक्रार केली. या संदर्भात तक्रारदाराला घाटकोपर स्टेशनला बोलवून पहिला हप्ता घेताना आरोपी नरसिंह यास मध्य रेल्वेच्या दक्षता पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाने 25 हजार स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. पै याने आपले रेल्वेमध्ये संपर्क असून सहा लाख दिल्या दोन महिन्यात रेल्वेची नोकरी लावून देण्याचे आश्वासन तक्रारदाराला दिले होते. परंतू त्याच्यावर संशय आल्याने तक्रारदाराने 12 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाकडे तक्रार केली.
घाटकोपर स्टेशन येथे मध्य रेल्वेच्या दक्षता पथक आणि आरपीएफ निरीक्षकांनी सापळा रचला होता. येथे आरोपी नरसिंह आर.पै याने 25 हजार स्वीकारताच त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. आरोपी पै याच्या मोबाईलची तपासणी केली असता तो पैसे गोळा करुन बिहारमधील अन्य व्यक्तीस पाठवत असतो असे उघडकीस आले आहे. आरोपीने कबूली दिली आहे की त्याने काही लोकांच्या संगनमताने रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त्या देण्याचे काम केले आहे. भारतीय दंड विधान कलम 420 आणि 34 अंतर्गत लोहमार्ग पोलिसांनी आरोपी नरसिंह पै याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर बनावट भरतीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पुढील तपास यंत्रणेमार्फत केला जात आहे.
नागरिकांनी रेल्वे भरतीसाठी अशा बनावट हॅंडलर्सकडे जाऊ नये. आणि त्यांच्या आमीषाला भुलून पैसे देऊ नयेत असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. सर्व शासकीय यंत्रणेत निवड आणि भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून त्यात वशीलेबाजी चालत नाही. कोणी जर असे आपला वशीला असल्याचे सांगून पैसे मागत असेल तर त्याची तक्रार पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ही कारवाई मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता अधिकारी आणि वरिष्ठ उप महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली दक्षता टीमचे अजय कुमार, के.डी.मोरे आणि रामकुमार सिंग, तसेच मुख्य दक्षता निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी ए.एम. आव्हाड, अरविंद बुडके आणि एस.एम.कोतवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अशा घटकांच्या तावडीत सापडण्यापासून अनेकांचा बचाव झाला आहे.