पोलीसांनी कपडे काढायला लावले की ‘झगा’ काढून महिला उभी? जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा सविस्तर

मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरबा खेळताना त्रास झाल्याने एका महिलेने तो काढून ठेवला, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधिमंडळात केला. (Jalgaon women's Hostel Assault Incidence)

पोलीसांनी कपडे काढायला लावले की 'झगा' काढून महिला उभी? जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा सविस्तर
जळगाव वसतिगृह


जळगाव : जळगावातील महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधिमंडळात दिलेल्या निवेदनात या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नाही, तर मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरबा खेळताना त्रास झाल्याने एका महिलेने तो काढून ठेवला, असं वक्तव्य अनिल देशमुखांनी विधिमंडळात केलं. (Jalgaon women’s Hostel Assault Incidence Home Minister Anil Deshmukh Claim Full Story)

जळगावातील महिला वसतिगृहात नेमकं काय घडलं?

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप झाला. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला.

वसतिगृहातील गैरप्रकाराच्या तक्रारी

बुधवार तीन मार्च रोजी सकाळी याविषयीचं वृत्त सर्वप्रथम माध्यमांनी दिलं. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून अनैतिक कृत्य?

काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चौकशीच्या नावाखाली पोलीस आणि बाहेरील व्यक्तींना वसतिगृहात प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

महिलांची आपबिती

कपडे काढून नाचायला लावतात इथे… मुलांकडून पैसे घेतात आणि मुलींना त्यांच्या नवऱ्यांना फोन लावून देतात…. जेवणाचे हाल करतात… लॉक लावून बाहेर जातात, विचारलं की सांगतात, ओरडायचं नाही, मिळेल ते खायचं.. असं सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ

गृहमंत्र्यांकडून चौकशी अहवाल सादर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी जळगाव वसतिगृह प्रकरणाच्या चौकशी अहवालातील माहिती विधानसभेत मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वसतिगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचवण्यात आल्याची रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Jalgaon women’s Hostel Assault Incidence Home Minister Anil Deshmukh Claim Full Story)

तक्रारदार महिला वेडसर असल्याचा दावा

याप्रकरणात ज्या महिलेने तक्रार केली आहे तिच्या नवऱ्याने अनेकदा आपली पत्नी वेडसर असल्याचे सांगितले आहे, तक्रार केली होती. तिला मनोरुग्णालयात पाठवण्यात यावे, असेही त्याने म्हटले होते. या वसतीगृहात कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. किंबहुना पोलिसांना या वसतीगृहात जाण्याची परवानगी नाही. 20 फेब्रुवारीला या वसतीगृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या झग्याचा त्रास व्हायला होत लागल्यामुळे तो काढून ठेवला.

या प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही, असा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

‘खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’

जळगाव वसतीगृहात असा कोणताही प्रकार न घडल्याचे समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. याप्रकरणात ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या आरोपांमुळे राज्याची आणि वसतीगृहातील महिलांची बदनामी झाल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

तर अजित पवार यांनीही विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिमटा काढला. महिलांच्याबाबत आपण कोणीही अन्याय खपवून घेणार नाही. मात्र, एखादा आरोप करताना विरोधी पक्षाने पूर्ण शहानिशा करावी, वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

Video | हाच तो व्हिडीओ ज्याच्यामुळे जळगाव पोलीसांचं ते कृत्य उघडं पडलं, पाहा तो व्हिडीओ… 

पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार 

‘त्या’ महिलेनेच अंगातील झगा काढला, गृहमंत्र्यांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात त्यादिवशी नेमकं काय घडलं?

(Jalgaon women’s Hostel Assault Incidence Home Minister Anil Deshmukh Claim Full Story)