शेतात शेळ्या घुसल्याच्या वादातून हत्या, तिघा सख्ख्या भावांना 5 वर्षांनंतर जन्मठेप

| Updated on: Oct 01, 2021 | 7:45 AM

हल्ल्यात राजेश यांच्या पाठ आणि पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतात शेळ्या घुसल्याच्या वादातून हत्या, तिघा सख्ख्या भावांना 5 वर्षांनंतर जन्मठेप
बोरखळ हत्याकांड प्रकरणी तिघा भावांना जन्मठेप
Follow us on

सातारा : सातारा तालुक्यातील बोरखळ येथे तीन सख्ख्या भावांनी चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके यांनी मारहाण करत भरदिवसा एकाचा खून केला होता. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेतात चुकून शेळ्या गेल्याच्या रागातून झालेल्या वादावादीत ही घटना घडली होती.

कोणाकोणाला अटक

रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघे रा. बोरखळ) अशी आरोपींची नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय 40 वर्ष, रा. बोरखळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मच्छिंद्र नारायण पाटील (वय 48 वर्ष) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे 28 जून 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता बोरखळ मधील कोळकीचा माथा येथे शेळ्या चरत होते. त्यावेळी त्यांच्या शेळ्या संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात गेल्या. शेतात शेळ्या गेल्याच्या कारणातून पाटील आणि रसाळ यांच्यामध्ये जोरदार वाद झाला आणि त्यातून पाटील यांना काठीने मारहाण झाली.

मारहाणीचा जाब विचारल्याने हल्ला

या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबीय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले. याच वेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात राजेश यांच्या पाठ आणि पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेची खातरजमा करुन सातारा तालुका पोलिसांनी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले.

तिन्ही भावांना जन्मठेप

न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी तिन्ही भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंड सुनावला. तो दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या :

40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे