40 वर्षीय भाजीविक्रेत्याच्या हत्येचं गूढ उलगडलं, अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्राकडून खून

सातारा जिल्ह्यात कराड-पुसेसावळी मार्गावर वाघेरी फाटा येथे तलवारीने वार करुन भाजी विक्रेत्याचा शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या रागातून चिडून जाऊन वर्गमित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसमवेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

40 वर्षीय भाजीविक्रेत्याच्या हत्येचं गूढ उलगडलं, अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्राकडून खून
कराडमधील हत्या प्रकरणात चौघांना अटक

कराड : सातारा जिल्ह्यात तलवारीने वार करुन झालेल्या हत्येप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी 24 तासात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून वर्गमित्रानेच तीन साथीदारांच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी चौघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यात कराड-पुसेसावळी मार्गावर वाघेरी फाटा येथे तलवारीने वार करुन भाजी विक्रेत्याचा शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या रागातून चिडून जाऊन वर्गमित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसमवेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. विश्वासघात केल्याच्या रागातून मित्राला संपवल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोण आहेत आरोपी?

दीपक ऊर्फ बाळकृष्ण शरद इंगळे (वय 38 वर्ष), संदीप सुभाष इंगळे (40 वर्ष, दोघेही रा. आर्वी, ता. कोरेगाव), आप्पा ऊर्फ सागर धनाजी इंगळे (वय 28 वर्ष) आणि गणेश विठ्ठल भोसले (वय 23 वर्ष, दोघेही रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी येथील रमेश पवार हा शनिवारी रात्री गावातीलच काही जणांसोबत पिकअप जीपमधून भाजीपाला खरेदीसाठी कराडला आला होता. भाजीपाला खरेदी करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण परत आर्वीला जात असताना वाघेरी फाटा येथे पाठीमागून जीपमधून आलेल्या दीपक इंगळे याच्यासह त्याच्या साथीदारांनी त्यांना गाडी आडवी मारली. रमेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चौघांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तलवारीने वार करुन निर्घृण खून केला.

24 तासात चार आरोपी ताब्यात

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार आणि उत्तम कोळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी सातार्‍यानजीक एमआयडीसी परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले.

पाठलाग करुन दोघांना पकडलं

या पथकाने दीपक इंगळे आणि त्याचा चुलत भाऊ संदीप इंगळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन आप्पा ऊर्फ सागर इंगळे आणि गणेश भोसले या दोघांना पाठलाग करुन सातारा एमआयडीसी चौकातून ताब्यात घेण्यात आले. चौघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

संबंधित बातम्या :

40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI