कॅनडाचा व्हिसा मिळवून देतो सांगत फसवणूक, जिम ट्रेनरला अटक
पीडित मुलगी कांदिवली ठाकूर गावातील रहिवासी आहे. पीडित महिलेचे वजन खूप वाढले होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तिने वैयक्तिक जिम ट्रेनर अपॉईंट केला होता.

गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : कॅनडाचा वर्किंग व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली एका हायप्रोफाईल महिलेकडून 13 लाख रुपये उकळणाऱ्या (13 lack Fraud by Gym Trainer) जिम ट्रेनरला कांदिवली पूर्व समतानगर पोलिसांनी पुण्यातून अटक (Accused Arrested in Pune) केली आहे. किरण मांडवकर असे अटक करण्यात आलेल्या जिम ट्रेनरचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
आरोपी महिलेचा पर्सनल ट्रेनर होता
पीडित मुलगी कांदिवली ठाकूर गावातील रहिवासी आहे. पीडित महिलेचे वजन खूप वाढले होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तिने वैयक्तिक जिम ट्रेनर अपॉईंट केला होता. दोन वर्षांपूर्वी गोल्ड जिममध्ये तिची किरणशी भेट झाली होती.
यादरम्यान तिने किरणला कॅनडाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर किरणने आपण अशा एका व्यक्तीला ओळखतो असे सांगत कॅनडाचा वर्किंग व्हिसा मिळवून देतो असे महिलेला सांगितले.
कॅनडाचा व्हिसा देतो सांगून 13 लाख उकळले
आरोपीने महिलेकडून व्हिजा मिळवून देतो सांगत 13 लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपीने कोणताही व्हिसा दिला नाही आणि तो फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने समतानगर पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली.
आरोपीला पुण्यातून अटक
समतानगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून किरणविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तपासादरम्यान किरण पुण्यात असल्याचे पोलिसांना कळले. तो जिम प्रोटीन विक्रेता बनून पुण्यात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचून किरणला अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी आतापर्यंत किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
आरोपीविरोधात कळवा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल
आरोपी हा कळवा इथला रहिवासी आहे. कळवा पोलीस ठाण्यात आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तो तीन महिने तुरुंगवास भोगून आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपला फसवणुकीचा गोरखधंदा सुरु केला.
