कल्याण-कर्जत महामार्गावरील जीवघेणी भिंत, भीषण अपघातात बाईकस्वाराचा जबडा फाटला

रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे दुचाकीस्वार भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला

कल्याण-कर्जत महामार्गावरील जीवघेणी भिंत, भीषण अपघातात बाईकस्वाराचा जबडा फाटला
कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध बांधलेली भिंत

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीने बांधलेली भिंत जीवघेणी ठरत आहे. भिंतीवर धडकून एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जबडा फाटला. (Ambernath Bike Accident Rider injured after colliding with Circular wall)

गोलाकार भिंतीवर आदळून बाईकस्वाराचा अपघात

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवर अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा अक्षरश: फाटला असून संपूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

गोलाकार भिंतीचं कारण काय?

कल्याण कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी मधोमध अशाच पद्धतीने गोलाकार भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीखालून एमआयडीसी, एमएसईबी यांच्या युटिलिटी लाईन्स गेल्या आहेत. या महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना या लाईन्स एका बाजूला स्थलांतरित करणं गरजेचं होतं. मात्र संबंधित यंत्रणांनी निधीअभावी या कामात फारसं स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे अखेर रस्त्याच्या मधोमध असलेल्या लाईन्सची दुरुस्ती करता यावी, यासाठी काही ठिकाणी डक्ट उघडे ठेवण्यात आले आहेत.

एमएमआरडीएचा दावा काय?

वाहनचालक त्यात पडू नयेत, यासाठी त्याला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मात्र अशा पद्धतीने राज्य महामार्गाच्या मधोमध तीन-तीन फुटांच्या भिंती उभारणं वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या भिंतींवर किमान धोका दर्शक फलक किंवा रेडियम तरी लावावेत, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या :

आंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव

चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा

(Ambernath Bike Accident Rider injured after colliding with Circular wall)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI