मुंबई : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची रविवारी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या अवघ्या 72 तासांच्या आतच त्याच्या नावाने कुलाब्यात एक विचित्र अफवा पसरवण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी मनोर आमदार निवासाचा (Manora Amdar Nivas) भूखंड गरिबांना झोपड्या बांधण्यासाठी दिल्याची अफवा पसरवण्यात आलेली होती. त्यानंतर कफ परेड परिसरात अनेक लोकांनी गर्दी केला. बांबू, काठ्या, ताडपत्री घेऊन मनोराच्या भूखंडावर जमल्यानंच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती जेव्हा पोलिसांनी मिळाली, तेव्हा कफ परेड पोलिसांनी (Colaba police station) घटनास्थळी धाव घेली. सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकूण 40 जणांना पोलिसांनी अटकही केली. तसंच गुन्हाही नोंदवला. अचानक जमावर आल्यानं मनोरा येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.