नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडेची नोकरी जाणार, जेलमध्ये टाकणार, आता वानखेडेंचं थेट उत्तर

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप करत जेलमध्ये टाकू, असा इशारा दिला होता. मलिकांच्या टीकेला समीर वानखेडे यांनी स्वत: प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडेची नोकरी जाणार, जेलमध्ये टाकणार, आता वानखेडेंचं थेट उत्तर
समीर वानखेडे, नवाब मलिक


मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप करत जेलमध्ये टाकू, असा इशारा दिला होता. मलिकांच्या टीकेला समीर वानखेडे यांनी स्वत: प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मलिक यांच्या आरोपांविरोधात आपण कायदेशीर कारवाई करणार, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

‘नवाब मलिक मला उघडपणे जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत’

“नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई काय करणार त्याबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही कायद्यानुसार योग्य निर्णय घेऊ. पण हे खूप गंभीर आहे. मंत्री नवाब मलिक मला उघडपणे जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत. मी फक्त देशाची सेवा करतोय त्यासाठी मला ते तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत”, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

‘मी दुबईला कधी गेलो? वेळ तर सांगा’

“मी मंत्री महोदयांचं बोलणं ऐकलं आहे. त्यांनी कुठले पुरावे सादर केले आहेत? मी त्याचं बोलणं ऐकलंय. ते मला दुबईत गेल्याचं म्हणाले. त्यांनी पुरावा म्हणून माझा कुठलातरी दुबईतला फोटो पत्रकार परिषदेत सादर केलाय. मी मंत्री साहेबांना विनंती करतो की, मी कधी आणि कोणत्या वर्षी दुबईला गेलो? ते सांगा”, असं आवाहन वानखेडे यांनी केलं.

‘मी माझ्या कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून मला तुरुंगात टाकणार?’

“ते मालदीव जाण्याचं बोलत आहेत. मालदीव जाणं हे क्राईम आहे का? मी सरकारची अनुमती घेऊन गेलो आहे. माझ्या मुलांबरोबर मी गेलो होतो. याचा अर्थ माझ्याकडून क्राईम झाला का? मी माझ्या कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून मला तुरुंगात टाकणार?”, असा सवाल त्यांनी केला.

‘माझ्यावर आरोप करतात ते ठीक, पण माझ्या बहिणीवर, माझ्या मृत आईवर आरोप’

“मी खूप सर्वसामान्य लहान शासकीय कर्मचारी आहे. मी माझी जबाबदारी करतोय. ते माझ्यावर आरोप करतात ते ठीक आहे. पण माझ्या बहिणीवर, माझ्या मृत आईवर आणि वडिलांवर ते आरोप करत आहेत. मी त्यांचा आदर करतो. पण मी त्यांच्या आरोपांचं खंडन करतो. मी माझं काम करतोय. सत्यासाठी लढतोय. पण त्यावरुन माझ्या आई-वडिलांवर आरोप केले जात आहेत”, असं समीर वानखेडे म्हणाले.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय.

‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्याती जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी समोर जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केलाय.

हेही वाचा : VIDEO : पुण्यात भर दिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत कोट्यवधींचं सोनं लुटलं, लाखोंची रोकड लंपास

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI