मध्य प्रदेशातून मुंबईत यायच्या… मळके कपडे, साधा लूक अन् टार्गेट पक्कं; लाखोंवर डल्ला मारणाऱ्या तिघींना अटक
मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून तीन महिलांना चोरीच्या आरोपांखाली अटक केली आहे. त्यांची मोडस ऑपरंडी ऐकून पोलीसही हैराण झाले. चोरी करण्यासाठी त्या महिला चक्क..

मुंबईतील गर्दीच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांना टार्गेट करून चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील या तिन्ही महिला मुंबईत येऊन काही दिवस मुक्काम करत आणि संधी साधून हात साफ करायच्या असा आरोप आहे. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी दोन मोठ्या चोऱ्या केल्या आणि तब्बल 3.75 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. सोनम बनेरी (वय 37), अनमोल जगवीर सिंह सिसोदिया (वय 27) आणि श्वेता सिसोदिया (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही महिला एकाच गावातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला दर काही महिन्यांनंतर मुंबईत येत असत. शहरात आल्यानंतर त्या साधारणपणे एका आठवडा किंवा 15 दिवसांपर्यंत लॉज किंवा हॉटेलमध्ये रहायच्या. त्यानंतर गर्दीच्या बाजारपेठांमध्ये फिरून चोरीसाठी योग्य व्यक्ती हेरायच्या, तेच त्यांचं टार्गेट असायचं.
पती गावी करायचे शेती, मुंबईत बायकांची चोरी
पोलिसांच्या तपासात या गँगची चोरीची अनोखी पद्धत समोर आली आहे. त्यांच्यापैकी एक महिला ही गर्दीच्या ठिकाणी संबंधित टार्गेटचं लक्ष विचलित करायची. आणि तीच संधी साधून चोरांपैकी दुसरी महिला संधी ही त्या व्यक्तीची पर्स, रोख रक्कम किंवा दागिने चोरत असे. तिसरी महिला आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून कोणी येत नाही ना, काही धोका नाही ना हे तपासायची. तिघी मिळून माल लंपास करायच्या . एवढंच नव्हे कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्या साधे आणि मळकट कपडे घालून गर्दीत मिसळत असत. मुंबईपर्यंतचा प्रवासही त्या प्रामुख्याने अनारक्षित रेल्वे डब्यांमधून करायच्या, असंही पोलिसांनी सांगितलं.चोरी रून झाल्यावर मिळालेली रक्कम, माल त्या तिघी एकमेकींमध्ये समसमान वाटून घ्यायच्या विषेष म्हणजे या तीन महिलांच पती हे गावी राहून शेती करायचे आणि मुलांचा सांभाळ करायचे तर या तिघी मुंबईत चोरी करायच्या, अशी माहिती समोर आली आहे.
अंधेरीत सलग दोन दिवस चोरी
या टोळीने अंधेरी परिसरात सलग दोन दिवस चोरी केल्याचा आरोप आहे. 7 ऑगस्ट रोजी अंधेरी मार्केटमधील जागृती स्वीट्समध्ये 45 वर्षीय पारिजात गावली खरेदी करत असताना त्यांना टार्गेट करण्यात आलं. महिलांनी त्यांचे लक्ष विचलित केल्यानंतर त्यांच्या पर्समधून सुमारे 3 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी, 8 ऑगस्ट रोजी, अंधेरी पश्चिम येथील मनीष मार्केटमध्ये 31 वर्षीय वासुदेवी सितावडेकर यांच्या पर्सवर हात साफ करण्यात आला. त्यांच्या पर्समध्ये 75 हजार रुपये रोख रक्कम होती. या दोन घटनांमध्ये एकूण 3.75 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांचा तपास
दोन्ही घटनांनंतर डी. एन. नगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. संशयित महिलांच्या मोबाइल क्रमांकांशी संबंधित तांत्रिक माहिती तपासल्यानंतर पोलिसांना त्यांच्या हालचालींचा मागोवा घेता आला. चोरीचा माल घेऊन या महिला मुंबईबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या लोकेशनवर लक्ष ठेवण्यात आलं. तपासादरम्यान तिन्ही महिला वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे आढळून आले. त्या स्थानकाजवळील एका लॉजमध्ये थांबल्या होत्या. डी. एन. नगर पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलिसांच्या महिला पथकाच्या मदतीने कारवाई करत तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं.
अटकेनंतर पोलिसांनी आरोपींकडून 50 हजार रुपये रोख आणि सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. हा मुद्देमाल अंधेरीतील दोन्ही चोरीच्या घटनांशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. तिन्ही महिलांनी ही आपली पहिलीच चोरी असल्याचा दावा केला. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत आणि मोडस ऑपरंडी पाहून यापूर्वीही त्यांनी अशीच चोरी केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
