यवतमाळच्या तरुणाचं महिलेच्या नावे चॅटिंग, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, दिल्लीच्या डॉक्टरची दोन कोटींना फसवणूक

विवेक गावंडे

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 7:40 AM

डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून दोन कोटींची रोख रक्कम, मौल्यवान दागिने फसवणूक करुन स्वीकारल्याची कबुली तरुणाने दिली. संदेश मानकर (रा. अरुणोदय सोसायटी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

यवतमाळच्या तरुणाचं महिलेच्या नावे चॅटिंग, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, दिल्लीच्या डॉक्टरची दोन कोटींना फसवणूक
डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवणारा यवतमाळमध्ये सापडला

यवतमाळ : महिलेच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊण्ट ओपन केले, त्यानंतर दिल्लीतील डॉक्टरची चक्क दोन कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या यवतमाळच्या तरुणाला अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी तरुणाकडून तब्बल एक कोटी 76 लाख 6 हजार 198 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून दोन कोटींची रोख रक्कम, मौल्यवान दागिने फसवणूक करुन स्वीकारल्याची कबुली तरुणाने दिली. संदेश मानकर (रा. अरुणोदय सोसायटी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी झालेल्या कारवाईनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

यवतमाळातील आरोपी संदेश मानकरने अनन्या सिंग नावाने इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊण्ट तयार केले. पीडित डॉक्टरची या फेक अकाऊण्टवरील व्यक्तीशी सोशल मीडियावरुन ओळख झाली. संदेशच महिलेच्या नावाने डॉक्टरशी चॅटिंग करत असे. ही ओळख काही काळात मैत्रीमध्ये बदलली.

दोन कोटी आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी

मी गर्भश्रीमंत आहे, माझ्या कुटुंबात अडचण निर्माण झाली आहे. मला 2 कोटी रुपये द्या, माझ्या बहिणीचे अपहरण करण्यात आले आहे, मला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, असे खोटे सांगून संदेशने डॉक्टरकडून पैसे उकळले. इतकंच नाही, तर यवतमाळ शहरातील दोन सराफा दुकानांमध्ये आरटीजीएस व्यवहार करायला लावून सोने खरेदी सुद्धा केली.

अकाऊण्ट अचानक बंद

दरम्यान, आरोपीने सोशल मीडियावरील अनन्या सिंगचे बनावट अकाऊंट अचानक बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट यवतमाळ गाठत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हे नोंदवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तरुणी नाही, तरुण निघाला

यवतमाळ सायबर सेलने याबाबत चौकशी सुरू केली असता, डॉक्टरांची फसवणूक करणारी तरुणी नसून तरुण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून पोलिसांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून अरुणोदय सोयायटीतील एका संशयित व्यक्तीच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी संदेश मानकर या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी त्या तरूणाकडून एक कोटी 72 लाख 700 रूपये रोख, चार लाखाचे सोन्याचे दागिने, चार विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण एक कोटी 76 लाख 6 हजार 198 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

संबंधित बातम्या :

नग्न फोटो व्हायरल करेन, नागपुरातील तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला, वडिलांच्या युक्तीने अशी झाली सुटका

लॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI