बायकोचे अश्लील व्हिडीओ काढले, नंतर डान्सबारमध्ये जबरदस्ती नाचवलं, नवऱ्याचा भयंकार कांड समोर!
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पतीने आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढून तिला डान्सबारमध्ये जबरदस्तीने नाचवलं आहे.

Nashik Crime News : पती-पत्नीचं नातं हे फारच पवित्र समजलं जातं. या नात्यात राग, भांडण, रुसवा फुगवा असला तरी कठीण काळात हेच पती-पत्नी एकमेकांना पाठिंबा देत असतात. अडचणीच्या काळात एकमेकांना धीर देत यशाची शिखरं गाठलेले अनेक पती-पत्नी आहेत. सध्या मात्र याच पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये एका माथेफिरू पतीने आपल्या बायकोचे अश्लील व्हिडीओ काढून तिला चक्क डान्सबारमध्ये नाचवलं आहे.
बायकोला जबरदस्ती डान्सबारमध्ये नाचवलं
ही घटना समोर येताच संताप व्यक्त केला जातोय. याबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल तक्रारीनुसार बायकोला डान्सबरामध्ये जबरदस्तीने नाचवणाऱ्या आरोपी पतीचे नाव पवन गाडेकर असे आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सध्या या प्रकरणातील पीडित महिलेच्या पतीसह आणखी एक जण फरार असून पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना नाशिक जिल्ह्यातील हिरावाडी येथे घडली आहे. दाखल तक्रारीनुसार आरोपी पवन गाडेकर या पत्नी त्याच्या पत्नीला अगोदर गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ काढल्यानंतर त्याने पत्नीला ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिला वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळही केली.
धक्कादायक प्रकरण समोर आल्याने संताप
आरोपी पती पवन गाडेकर आणि अक्षय गांगुर्डे यांनी मारहाण, शिवीगाळ करून तिला जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले आहे. पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात तसेच त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणामुळे चीड व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय होणार?
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सर्वच बाजूने तपास करत आहेत. पती-पत्नीमध्ये अगोदर भांडणे होती का? पत्नीने केलेल्या आरोपांत काही तथ्य आहे का? या प्रकरणात पतीच्या मित्राची काय भूमिका आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस सोधत आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
