Nashik: भाजपच्या पराभूत उमेदवारचं घर जाळ्याचा प्रयत्न, घरात घुसत अश्लील…मित्रपक्षातील वाद टोकाला, विजयाच्या उन्मादानं राज्य हादरलं…
Nashik News: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इथं भाजपच्या पराभूत उमेदवाराचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नाही तर घरात घुसत अश्लील कृत्य करण्यात आले. शिंदे सेनेच्या विजयी उमेदवाराविरोधात भाजपच्या उमेदवारानं दाखल केलेल्या तक्रारीआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काय आहे ती अपडेट?

Nashik BJP-Shinde Shivsena: नाशिकमधून एक मोठी वार्ता समोर येत आहे. भाजपच्या पराभूत उमेदवाराचं घर जाळण्याचा प्रयत्न शिंदे सेनेच्या विजयी उमेदवारानं केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.पोलिसांनी याप्रकरणी शिंदे सेनेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे. राजकीय वादाची किनार या सर्व प्रकाराला असल्याचे समजते. तर मित्रपक्षातील वाद टोकाला गेल्याचेही दिसून येत आहे. यापूर्वी नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवार शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर राज्यात अनेक भागात राजकीय वादातून हल्ल्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.
विजयी उमेदवारावर गुन्हा
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी त्यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालत घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याचा आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर स्टेशन पोलिसांनी शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास झालेल्या घटनेनंतर पोलिसांकडून तपास करत गुन्हा दाखल करत घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान राज्यात राजकीय वादाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
नगरसेविकेची आभार रॅली
तर दुसरीकडे नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळवता आली. अजित पवार गटाच्या एकमात्र नगर सेवक म्हणून प्रभाग 21 मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी आज जनतेचे आभार मानण्यासाठी आभार रॅली काढली. शांती नगर परिसरातून ही मोठी रॅली काढण्यात आली. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या विश्वासावर खरं उतरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आभा पांडे म्हणाल्या. माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषी आणि पैशाचा वापर केला असे आरोप लावले होते. मात्र जनतेने माझ्या कामाला पसंती दिली. अजित पवार यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखविला आता जनतेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी पूर्ण करणार असं अजित पवार गटाच्या एकमात्र नगरसेविका आभा पांडे यांनी सांगितलं
