ऑनलाईन रमीमुळे कर्जबाजारी झाला, पैशांसाठी केलं असं काही… थेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण जीआरपीने ऑनलाइन रमीच्या व्यसनात अडकून कर्जबाजारी झालेल्या ऋषिकेश बेनकेला अटक केली आहे. पावसाळ्यात त्याचे दुकान बंद असल्याने आणि रमीमुळे आर्थिक संकटात सापडल्याने, त्याने धावत्या लोकलमधून महिलांचे दागिने लुटण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन रमी खेळण्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचे दागिने लुटण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋषिकेश बेनके (३५, रा. खर्डी) असे या तरुणाचे नाव असून, कल्याण जीआरपी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पावसाळ्यात रसवंती गृहाचे दुकान बंद झाल्याने आणि जुगाराच्या व्यसनामुळे तो आर्थिक संकटात सापडला होता.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून कल्याण-कसारा स्टेशन दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमधून महिला प्रवाशांचे महागडे दागिने हिसकावून चोरटा पळून जात असल्याची रेल्वे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. विशेषतः खर्डी आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान अशा अनेक घटना घडल्या होत्या. चोरटा लोकल ट्रेनच्या उलट्या दिशेने उडी मारून पळ काढत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या चोरट्याला शोधण्यासाठी दोन तपास पथके नेमली. तपासादरम्यान, पोलिसांना चोरटा लोकल ट्रेनमधून उडी मारून पळ काढत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजच्या आधारे आणि गुप्त माहितीच्या बळावर, हा चोरटा खर्डी येथीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस पथक खर्डी येथे ऋषिकेशच्या घरी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजमधील तरुण हा ऋषिकेश बेनकेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
गुन्हा कसा उघडकीस आला?
यानंतर पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत ऋषिकेशने धक्कादायक माहिती दिली. तो खर्डीमध्ये रसवंती गृह चालवतो. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने त्याचे दुकान बंद झाले. याच काळात त्याला ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद लागला. ज्यामुळे तो प्रचंड कर्जबाजारी झाला. एकीकडे उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. तर दुसरीकडे जुगारात पैसे गमावल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेतून त्याने चोरीचा मार्ग निवडला अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
तो लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांना हेरून त्यांच्याजवळ बसायचा. ट्रेन स्टेशनवर थांबताच, महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (चेन) हिसकावून धावत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उडी मारून पळून जायचा. त्याने अशा अनेक घटना केल्याचे निष्पन्न झाले आहे. कल्याण जीआरपी पोलिस ऋषिकेशने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करत आहेत. त्याच्या अटकेने कल्याण-कसारा मार्गावरील महिला प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
