आमदार बनसोडेंच्या मुलावर कारवाईत दिरंगाई, कृष्णप्रकाश यांची ‘आयर्नमॅन’ इमेज धोक्यात

आमदार बनसोडेंच्या मुलावर कारवाईत दिरंगाई, कृष्णप्रकाश यांची 'आयर्नमॅन' इमेज धोक्यात
Krishna Prakash, Anna Bansode

सात दिवस झाले तरी आयर्नमॅन कृष्णप्रकाश आणि त्यांच्या पोलिसांना आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडेला पकडण्यात यश आलेले नाही (Krishna Prakash Anna Bansode Firing )

अनिश बेंद्रे

|

May 21, 2021 | 11:46 AM

पिंपरी चिंचवड : आयर्नमॅन, गुंडांचा कर्दनकाळ, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा अशा अनेक बिरुदावली पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash) मिरवतात. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (NCP MLA Anna Bansode) गोळीबार प्रकरणावरुन कृष्णप्रकाश यांच्या इमेजला तडे जाण्याची शंका व्यक्त होत आहे. आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash Iron Man image in Danger in MLA Anna Bansode Firing Case)

आमदार बनसोडेंच्या मुलावर गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी गोळीबार झाला होता. बनसोडे यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अगदी काही तासांतच पकडले. परंतु तपासानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. अण्णा बनसोडे यांनी आरोपी हल्लेखोराला शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डिंगही पुढे आले. एवढंच नाही तर हल्लेखोराच्या कंपनीत जाऊन आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याने साथीदारांसह तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल झाला.

आठवड्याभरानंतरही कारवाई नाही

आमदार पुत्रावर आणखी एक अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला. परंतु सात दिवस झाले तरी आयर्नमॅन कृष्णप्रकाश आणि त्यांच्या पोलिसांना आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडेला पकडण्यात यश आलेले नाही. एरवी दहा तोळ्यांचे सोने पकडले, चार दुचाकी पकडल्या, तरी प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या कृष्ण प्रकाश यांना या ठिकाणी मात्र कामगिरीची छाप पाडता आलेली नाही.

आमदार बनसोडेंचा गोळीबाराचा बनाव?

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी स्वतःच्या दिशेने गोळीबार झाल्याचं पहिल्याच दिवशी म्हटलं होतं. पण अद्याप तरी तसा कोणताही पुरावा पोलिसांना सापडून आलेला नाही. त्यामुळे गोळीबाराचा हा बनाव असल्यास आमदारांवर गुन्हा दाखल केला जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भाष्य करणं टाळलं. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.

राजकीय दबावाची चर्चा

कसल्याही दबावाला न झुकणारे अशी इमेज कृष्णप्रकाश यांनी बनवली आहे. त्यांचे प्रसार माध्यमातले चाहते ही इमेज जपण्यासाठी कायम धडपडत असतात. परंतु इथे आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात झालेली त्यांची इमेज, आमदार पुत्रावर होत नसलेल्या कारवाईमुळे धोक्यात आली आहे. त्यांना त्यांची आयर्नमॅन ही इमेज कायम ठेवायची असेल, तर धडक कारवाई करुन आमदार पुत्राला कायद्याच्या चौकटीत आणण्याची गरज असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

CCTV VIDEO | राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार करणाऱ्याचीच उलट तक्रार, आमदाराच्या मुलावर गुन्हा

(Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash Iron Man image in Danger in MLA Anna Bansode Firing Case)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें