Mumbai Crime : झटपट पैशांसाठी कायपण ! चोरट्यांनी चक्क सतरा लाखांचा जेसीबीच पळवला
पैशांच्या लोभापायी माणूस काय अतरंगी मार्ग लढवतो, याचंच एक ताजं उदाहरण अंधेरीत समोर आलं आहे. तेथे पैशांच्या लोभापायी काही भामट्यांनी चक्क रस्त्यावर उभा असलेला जेसीबीच पळवला. सुमारे सतरा लाख रुपयांचा हा जेसीबी पळवणाऱ्या तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली
मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : झटपट पैसे मिळवून भरपूर श्रीमंत व्हावी अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्या मोहापायी लोकं काहीही करून बसतात. मात्र अशा छुप्या किंवा वेगळ्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीतरी अडचणीत आणू शकतो. पैशांच्या लोभापायी माणूस काय अतरंगी मार्ग लढवतो, याचंच एक ताजं उदाहरण अंधेरीत समोर आलं आहे. तेथे पैशांच्या लोभापायी काही भामट्यांनी चक्क रस्त्यावर उभा असलेला जेसीबीच पळवला. सुमारे सतरा लाख रुपयांचा हा जेसीबी पळवणाऱ्या तीन भामट्यांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद रशीद शेख, तबरेज शेख आणि शफी शेख अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्या तिघांनाही अंधेरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंबोली पोलिसांनी त्या तिघांकडून चोरी केलेला जेसीबी जप्त केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी चोरला जेसीबी
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार किशोर नामदेव राठोड हे गोरेगाव येथील शास्त्रीनगर परिसरात राहतात. त्यांनी त्यांच्या कंपनीचा सतरा लाख रुपयांचा एक जेसीबी अंधेरीतील लिंक रोड येथे मेट्रो स्टेशनजवळ उभा केला होता. मात्र साधारण दोन महिन्यांपूर्वी, ११ सप्टेंबर रोजी काही चोरट्यांनी हा जेसीबी चोरी केला होता.
हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आला होता. त्यानंतर राठोड यांनी आंबोली पोलिसांत जेसीबी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर दोन महिन्यांच्या तपासानंतर तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद रशीदला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी मोहम्मदने जेसीबी चोरीची कबुली दिली. या चोरीसाठी त्याने तबरेज शेख आणि शफी शेख या दोघांचीही मदत घेतली होती.
मुंबईतून जेसीबी चोरल्यानंतर तिघेही तो जेसीबी बीड येथे घेऊन गेले. ही माहिती उघडकीस येताच पोलिसांनी इतर दोन आरोपी तबरेज आणि शफी या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेला जेसीबी हस्तगत केला आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून मोहम्मद रशीद आणि तबरेज यांच्याविरुद्ध दोन तर शफीविरुद्ध एका गुन्ह्याची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.